बारामती : बारामती मतदारसंघात मागील ४० वर्षांपासून राष्ट्रवादीची सत्ता आहे. जनतेने मते दिली आहेत. या मतांचे कर्ज असल्यानेच बारामतीचा विकास आहे. त्यामुळे बारामतीवर उपकार केले नाहीत अशी घणाघात टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
पुणे जिल्हा भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मंगळवारी (ता. ६) बारामतीतील मुक्ताई लॉनमध्ये भाजपा पुणे जिल्हा ग्रामीण विभागाचा संघटनात्मक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बावनकुळे बोलत होते.
यावेळी बारामती लोकसभा क्षेत्राचे प्रभारी राम शिंदे, आमदार गोपीचंद पडळकर, दौंडचे आमदार राहुल कुल, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, भाजयुमो प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, भीमराव धापके, संदीप गिरे, कांचन कुल यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
बारामती लोकसभा निवडणुकीचा नारळ कन्हेरी गावातील जागृत हनुमानाचे दर्शन घेऊन फोडला. यानंतर त्यांनी काटेवाडी येथील बुथवर भेटी दिल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला माल्यार्पण केले. आहिल्यादेवी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत भाजपा रैलीत सहभागी झाले. कसबा युवा वॉरिअर्स शाखेचे उद्घाटन, भाजपा कार्यालयास भेट दिली. मारेगाव येथे बुथ स्तरीय बैठक घेतली. या सर्व ठिकाणी त्यांनी आगामी निवडणुकीसाठी तयारी करण्याचे आवाहन भाजपाच्या कार्यकर्त्यांना केले.
यापुढे बोलताना बावनकुळे म्हणाले, “कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या विचाराने चालणारी शिवसेना खरी असूच शकत नाही. खरी शिवसेना हिंदुत्वाची जपवणूक करणारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्त्वातील आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली अलस्याचा टोला त्यांनी लगावला. मागील अडीच वर्षांत ओबीसी आरक्षण मविआ सरकारला टिकविता आले नाही. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचाच पुढाकार घ्यावा लागला, असेच मराठा आरक्षणही मिळवून देणार, असेही ते म्हणाले.
दरम्यान, बारामती लोकसभा क्षेत्राची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमनजी यांना दिली आहे. त्याचा दौरा या महिन्यात होणार आहे. खुद्द पंतप्रधान मोदी बारामतीला येणार असून ते सभा घेणार असल्याचे कार्यकर्त्यांना सांगितले.