पुणे : महाराष्ट्रासह जगभरात कोविड -१९ या साथीच्या रोगाने धुमाकूळ घातला आहे. या काळात पोलिसांनी मोठी जबाबदारी पार पाडली होती. ही जबाबदारी पार पाडताना पुणे जिल्हयातील ६ पोलीस पाटील यांचा मृत्यू झाला आहे. याच दिवंगत पोलिसांच्या कुटुंबियांना शासनातर्फे रूपये ५० लाख अनुदान देण्यात आले आहे. अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
पुण्यातील पोलीस मुख्यालय भिमाशंकर हॉल येथे आज शनिवार (ता. १५) पुणे ग्रामीण पोलीस दल स्मृतिचिन्ह अनावरण सोहळा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी दिवंगत पोलिसांच्या कुटुंबियांना कोविड योध्दा म्हणुन स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवून पालकमंत्री चद्रकांत पाटील यांच्या हस्ते देण्यात आले आहे.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, उषा लक्ष्मण, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, पुणे ग्रामीण पोलीस दलातील विविध शाखांचे अधिकारी, अंमलदार, दिवंगत पोलीस पाटील यांचे कुटुंबिय उपस्थित होते.
समाजातील प्रत्येक सामान्य नागरीक हा गणवेश न घातलेला पोलीसच असतो. काही नागरीक हे पोलीस दलात त्यांचे कर्तव्य पार पाडतांना निस्वार्थी भावनेने मदत करत असतात. महिलांवरील व बालकांवरील अत्याचार तसेच इतर गंभीर गुन्हे, ज्यामध्ये साक्षीदार यांनी पिडीत कुटुंबियांशी कोणतेही नातेसंबंध नसतांना सामाजिक जाणीव ठेवुन खऱ्याच्या बाजुने साक्ष दिल्याने आरोपींना न्यायालयाकडुन शिक्षा सुनावण्यात आली. पुणे ग्रामीण घटकातील गुन्हयामध्ये साक्ष दिल्यामुळे आरोपींना शिक्षा सुनावण्यात आलेल्या, अशा एकुण ९ साक्षीदारांचा सत्कार पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला.
दरम्यान, प्रसिध्द व्यंगचित्रकार श्री. आर. के. लक्ष्मण यांनी भारतातील सामान्य माणसाच्या जिवनातील संघर्ष व सामाजिक राजकीय परीस्थिती तसेच समाजातील चालीरूडी या सारख्या अनेक विषयावर चित्रे रेखाटली असुन त्यास संपुर्ण भारतात प्रसिद्धी मिळालेली आहे. त्यांनी सामान्य माणुस व पोलीस या विषयावर देखील व्यंगचित्रे काढुन समाजातील सामान्य माणसामध्ये असलेला सन्मान दाखविलेला आहे.
अशाच प्रकारचे सामान्य माणुस व पोलीस यांचे व्यंगचित्र असलेले शिल्प शिल्पकार डॉ. गिरीश चरवड यानी बनवलेले असुन सदर शिल्पाची प्रतिकृती पुणे ग्रामीण पोलीस दलाचे स्मृतीचिन्ह म्हणुन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यानंतर या स्मृतीचिन्हाचे शिल्पकार गिरीष चरवड व प्रशांत गायकवाड यांचा स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला.