मुंबई : तीन दिवसांपूर्वी सुरु झालेल्या ‘5 जी’ सेवेवर ‘सामना’ मधून आज टीका करण्यात आली आहे. ‘5 जी’ डिजिटल क्रांतीची पहाट होत असतानाचे हे चित्र काय सांगते? देशाची अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे ढोल बडवणाऱ्या मोदी सरकारचे अर्थकारण पुरते बिघडले आहे, अशी टीका शिवसेनेने भाजपवर केली आहे.
मोदी यांना वेगाचे वेड आहे. ते देशाला गतिमान करू इच्छितात. त्यांनी जपानच्या मदतीने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू करण्याचे मनावर घेतले व आसपासच्या भागातील जमिनी या प्रकल्पासाठी ताब्यात घेतल्या. म्हणजे या विकासात शेतकरी व जमीनमालकांचेही योगदान आहे हे लक्षात घेतले पाहिजे. देशात सुरू झालेली ‘5 जी’ सेवा विकासात भर घालणारीच आहे, मात्र गेल्या पाच-सहा वर्षांत देशाच्या राजकारणाचे ‘हांजी हांजी’करण ‘5 जी’च्या वेगाने आधीच सुरू झाले व ते पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिमेस तडा देणारे आहे. घराणेशाही, वंशवादाच्या राजकारणात ‘हांजी हांजी’ चालते, पण लोकशाहीत ‘5 जी’वर ‘हांजी’ने मात करू नये इतकीच अपेक्षा असते, असा टोला देखील शिवसेनेने लगावला आहे.
डिजिटल भारताचे स्वप्न राजीव गांधींच्या काळात सुरू झाले. अटलबिहारी यांच्या काळात तेव्हाचे दूरसंचार मंत्री प्रमोद महाजन यांनी ते गतिमान केले व आता मोदी युगात ‘5 जी’ सेवेने ही गती रॉकेटच्या वेगाने पुढे जाताना दिसत आहे. 5 जी ही स्वदेशी यंत्रणा आहे. या नव्या स्वदेशी यंत्रणेमुळे नव्या युगाची पहाट झाली आहे. 130 कोटी भारतीयांना ‘5 जी’च्या रूपात एक सुंदर भेटवस्तू मिळाली आहे असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. त्यातील मुख्य फायदा असा की, ‘5 जी’मुळे देशात रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. देशातील खरी समस्या महागाई आणि रोजगाराचीच आहे. डिजिटल भारताचे पुढचे पाऊल बेरोजगारीच्या छाताडावर पडले तर आनंदच आहे, असे या अग्रलेखात नमूद केले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व मिंधे गटाचे मुख्य नेते हे पनवेल येथील शाळेत खास उपस्थित राहून ‘5 जी’च्या शुभारंभ कार्यक्रमात सहभागी झाले. पनवेलमधील शाळेत मुख्यमंत्री विद्यार्थी बनले. ते विद्यार्थ्यांबरोबर बाकावर बसले. त्यांनी म्हणे विद्यार्थ्यांना ‘5 जी’चे महत्त्व समजावून सांगितले. ‘5 जी’मुळे इंटरनेटला मिळणाऱ्या वेगाचा फायदा अभ्यासासाठी करा, गेम आणि सिनेमे डाऊनलोड करण्यासाठी नाही, असे मार्गदर्शन मुख्यमंत्र्यांनी केले व ते योग्यच असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.