दिनेश सोनवणे
दौंड : तरुणीचा विनयभंग करून कुटुंबियांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशाहा शेख यांच्यासह २० जणांवर ॲट्रॉसिटीसह विनयभंगाचा दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून सध्या आरोपी बादशाहा शेख फरार झाला आहे. आरोपीला ४८ तासात अटक करा, अन्यथा पुढील होणाऱ्या घटनेला पोलिस प्रशासन जबाबदार असेल, असा थेट इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.
आमदार नितेश राणे यांनी पिडीत तरुणीच्या कुटुंबियांची भेट आज गुरुवारी (ता.१७) घेतली. यावेळी पीडित महिला व कुटुंबासहित भाजप आमदार नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत दौंड पोलीस स्टेशन ठाण्यावर मोर्चा काढला. यावेळी आमदार राणे यांनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरले. पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस, दौंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्याशी चर्चा केली आहे.
आमदार राणे म्हणाले की, हिंदूवर अन्याय करणाऱ्या बादशाहला पोलीस का अटक करत नाही? पोलिसांचे अर्थपूर्ण लागेबंधे असल्याने पोलिसांनी या बादशहाला फरार दाखवले आहे, या बादशहाची दौंड शहरात दहशत असल्याने एका हिंदू खाटीक समाजाच्या पीडित महिला व कुटुंबाला न्याय देण्यासाठी एक हिंदू म्हणून मी दौंड मध्ये आलो आहे.
या पीडित कुटुंबाला मी ताकद देणार असून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे, या बादशहाला कोणी पाठीशी घालायचा त्याला घालू दे, यापुढे या बादशहाने दौंड शहरात हिंदूवर दहशत करण्याचा प्रयत्न केला. तर त्याची दौंड शहरातून धिंड काढू असा इशारा राणे यांनी दिला.
दरम्यान, पुढील ४८ तासांचा अवधी पोलिसांना दिला आहे. पोलिसांनी या बादशहाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नये हे महाविकास आघाडीचे सरकार नाही तर एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आहे. हे हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे, देवेंद्र फडणीस हे राज्याचे गृहराज्यमंत्री आहेत, देवेंद्र फडणीस यांच्याशी या संदर्भात चर्चा करणार असून या प्रकरणाची सीआयडी मार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी मी त्यांच्याकडे करणार आहे. असेही आमदार राणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.