पुणे : चिंचवड पोट निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यावर टीका करताना अजित पवार यांना ४४० चा करंट लागला पाहिजे असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याला अजित पवार यांनी आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिले आहे.
‘अरे बापरे, ४०० चा करंट म्हणजे मी मरून जाणार. एवढा मोठा करंट बसल्यावर मी कसा जगू शकतो? अरेरे, मला आता माझ्या मतदारांना, माझ्या कार्यकर्त्यांना, सगळ्यांना श्रद्धांजली अर्पण करावी लागेल’, बावनकुळे यांच्या वक्तव्यावर मिश्किल शब्दांत अजित पवारांनी टोला लगावत बावनकुळे यांना उत्तर दिले आहे.
चिंचवड येथे चिंचवडचे उमेदवार नाना काटे यांच्या प्राचारासाठी अजित पवार यांच्यासह अनेक राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आले होते. त्यावेळी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी अजित पवार बोलत होते.
यापुढे बोलताना अजित पवार म्हणाले, ” यावेळी अजित पवार म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे यांना म्हणावं आपण एका सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष आहात. आपण काय बोलतो याचा ताळमेळ असायला हवा. बोलण्याची संधी मिळाली म्हणून उगीच काहीही बोलायचं, उचलायची जीभ आणि लावायची टाळ्याला असं करू नका. बोलताना जरा तारतम्य ठेवा. मानसिक संतुलन बिघडू देऊ नका, असा सल्ला देखील अजित पवार यांनी बावनकुळे यांना दिला आहे.”
दरम्यान, चिंचवड आणि कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीकास्त्रं सोडत आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चिंचवड येथे एका बैठकीत बोलताना अजित पवार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, ‘येत्या २६ फेब्रुवारीला चिंचवड आणि कसबा मतदारसंघात मतदान होणार आहे.
त्यावेळी तुम्ही इतक्या जोरात ईव्हीएमचे बटण दाबा की, अजित पवार यांना ४४० व्होल्टचा करंट लागला पाहिजे आणि पुन्हा कधी अजित पवार यांनी चिंचवडचे नाव घेतले नाही पाहिजे याची काळजी तुम्ही घ्या.’ बावनकुळे यांच्या याच वक्तव्यावर अजित पवार यांनी आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिले आहे.