संदीप टूले
केडगाव, ता.२९ : दौंड तालुक्यातील ऊस उत्पादक सभासद व कामगारांच्या मालकीचा असलेला एकमेव कारखाना म्हणून ओळखला जाणाऱ्या आणि सध्या कर्नाटक येथील निराणी ग्रुपला भाडेतत्त्वावर चालवायला दिलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर पाटस येथे वादळी स्वरूपात पार पडली.
भीमा पाटस कारखान्याच्या वार्षिक अहवालावरून कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष मधुकर शितोळे यांना हटवले, म्हणून दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी भीमा पाटस कारखान्यावर दुपारी १२ वाजता निषेध मोर्चा काढला. त्यावेळी त्यांनी भीमा पाटसचे अध्यक्ष राहुल कुल व संचालक मंडळावर जोरदार टीका केली.
कारखाना प्रशासनाची नियोजन ७० हजार साखर पोती जाळण्याचे खोटे कारस्थान, वैयक्तिक खासगी कॉलेज, सुभाष अण्णा दूध संघ, राहूच्या विकास सोसायटीवरही टीका करण्याची संधी थोरात यांनी सोडली नाही. वडिलांच्या नावाने सुरू केलेल्या दूध संघातही चोरी पकडली गेली आहे. त्याचा गुन्हाही यवत पोलिसांत दाखल आहे, अशा गंभीर स्वरूपाचे आरोप त्यांनी या वेळी केले. तर दुपारी एक वाजता सुरु झालेल्या भीमा पाटसच्या सर्वसाधारण सभेत राहुल कुल यांनी त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. या वेळी विविध विषय वाचन करताना किरकोळ गोंधळ उडाला. मात्र, कुल यांनी प्रश्नांना योग्य पद्धतीने उत्तरे दिल्याने हा गोंधळ शमला.
सभेच्या सुरुवातीला कुल यांनी कारखान्याच्या कामकाजाबाबत माहिती दिली. आज झालेल्या मोर्चाबाबत माहिती देताना, ज्यांनी कारखाने खासगी केले तेच यावर प्रश्न उपस्थित करतात, ही शोकांतिका असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. २००२ साली कारखाना चालवावा की नाही, अशी परिस्थिती असताना पॅनल उभे केले आणि निवडून आलो असे सांगितले आणि जे लोक फोटोचा विषय पुढे करून राजकारण करू पाहत आहेत, त्यांनी भीमा पाटस कारखान्यातील देवेंद्र फडणवीस, जेष्ठ नेते शरद पवार दोघांचे फोटो कार्यालयात आजही आहेत, ही आमची कृतज्ञता असल्याचे त्यांनी म्हटले.
कारखाना डुबवला त्यांचे निवडणूक लढवण्याचे धाडस झाले नाही. तसेच अहवालात कुणाचे फोटो छापले, कुणाचे नाही यावरून वाद उद्भवला. त्यामुळे गेली चार वर्षे कुणाचाच फोटो अहवालात छापला गेला नाही. यामध्ये माजी अध्यक्ष मधुकाका शितोळे, कै. आमदार सुभाषअण्णा कुल यांसह कुणाचाच फोटो न छापण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अहवालात कुणाचेच फोटो छापले नव्हते. मात्र सर्वांची इच्छा असेल तर कै. मधुकाका शितोळे आणि कै. आमदार सुभाष अण्णा यांचे फोटो छापले जातील आणि त्यांचे पुतळेही कारखान्याच्या आवारात बसवले जातील, असे आश्वस्त केले.
राहुल कुल यांनी भीमा पाटस कारखान्याला मदत केल्याबद्दल गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले. तसेच निराणी ग्रुपचे आभार मानले. कुल म्हणाले की, कारखान्याचे टेंडर तीन वेळा निघाले; पण अटी किचकट होत्या, त्यामुळे कुणी टेंडर भरत नव्हते. निराणी ग्रुपने दीडशे कोटी भरून ते येथे भाडेतत्वावर आले. त्यामुळे कारखाना सहकारीच राहणार आहे, खासगी होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी वैशाली नागवडे आणि अध्यक्ष कुल यांच्यामध्ये शाब्दिक चकमक रंगल्याचे पहायला मिळाले. यावेळी वैशाली नागवडे आणि उपस्थित सभासदांमध्येही काही काळ तणाव निर्माण झाला होता. हे सर्व सभासद कुल समर्थक असून, आपल्याला बोलू देत नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. भीमा पाटसच्या ४१ व्या सर्वसाधारण सभेला सर्व संचालक मंडळ तसेच कारखान्याचे संचालक आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वार्षिक सर्वसाधारण सभेचे सूत्रसंचालन भीमा पाटसचे संचालक विकास शेलार यांनी केले. सर्वांचे स्वागत उपाध्यक्ष नामदेव बारवकर यांनी केले.