पुणे : रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत खराब झाला असून ग्लोबल वॉर्मिंगचा वाढता धोका लक्षात घेता राज्यात २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
पुण्यात ‘नैसर्गिक शेती’ राज्यस्तरीय परिषद २०२२ चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. यावेळी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे देखील उपस्थित होते. डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात २०२५ पर्यंत २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्यात येणार आहे.
यापुढे बोलताना फडणवीस म्हणाले, “२०१६-१७ मध्ये नैसर्गिक शेतीचे अभियान सुरु केल्यानंतर ९.५ लाख हेक्टर शेती नैसर्गिक पद्धतीने होत आहे. दुसऱ्या टप्प्यात हे क्षेत्र वाढवण्यासाठी कृषी आणि फलोत्पादन विभागानं आखलेल्या कार्यक्रमाला आवश्यक निधी देण्यात येईल. तसेच पुढच्या टप्प्यात गावं जलस्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्या पाण्याचा योग्य उपयोग गावात व्हावा आणि नैसर्गिक शेतीला चालना मिळावी यामुळं शेतकरी सुजलाम-सुफलाम होईल असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिक शेतीसाठी २०१५-१६ मध्ये केंद्र स्तरावर मिशन सुरू केले. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात २०१६-१७ मध्ये सुरू केलेले डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन यशस्वी ठरले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचे गट तयार झाले. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांना एकत्र करून उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि त्यांना सेंद्रीय शेतीकडे वळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. या मिशनचा कालावधी संपत असला तरी त्यास नव्याने मुदतवाढ देण्यात येईल. यात अजून काही जिल्हे समाविष्ट करण्यात येतील आणि नैसर्गिक शेतीला चालना दिली जाईल असेही फडणवीस म्हणाले.
स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरू करण्यात आलेला ‘स्मार्ट’ प्रकल्प महाराष्ट्रातल्या १० हजार गावांमध्ये सुरु करण्यात आला. या प्रकल्पावर २ हजार १०० कोटी खर्च करून व त्यांच्या माध्यमातून बाजारपेठेची श्रृंखला तयार करून शेतकऱ्याला योग्य भाव देण्यासाठी राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून साठवणूक व्यवस्था, विविध श्रृंखला तयार करणे, मार्गदर्शन, बाजाराशी लिंकेज याद्वारे शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करून त्यांना निधी उपलब्ध करून देण्याचे काम करण्यात येत आहे. या प्रकल्पालाही गती देण्यात येत असल्याचं फडणवीसांनी सांगितलं
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले, “नैसर्गिक शेतीमुळे जलप्रदूषण होणार नाही, पर्यावरणाचे रक्षण होईल, पाण्याची बचत व जमिनीचा पोत चांगला राहील, गोधन वाचेल, नागरिकांचे आरोग्य चांगले राहील, देश आत्मनिर्भर बनून शेतकऱ्यालादेखील लाभ होईल. त्यामुळं देशात नैसर्गिक शेतीसाठी लोकचळवळ उभी करुन प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत त्याबाबतची माहिती पोहोचवावी.”