पुणे : पुणे शहरातील पूर संरक्षक भिंत, कात्रज कोंढवा-रस्त्यासाठी भूसंपादन, उड्डाणपूल, अंडरपास, ग्रेड सेपरेटरसह विविध विकास कामांच्या प्रस्तावांना २ हजार कोटींची मान्यता देण्यात आली आहे. अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच तीन वर्षात या कामांसाठी शासनाचा हिस्सा देण्यात येईल आणि यावर्षापासून काम सुरू करण्यात येणार आहे. असेही फडणवीस यांनी सांगितले आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आले होते. त्यावेळी पत्रकारपरिषदेत बोलताना फडणवीस यांनी वरील घोषणा केली.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, राज्य शासनाचे ६० टक्के आणि ४० टक्के महानगरपालिकेने खर्च करण्याच्या योजनेनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या कामांमुळे पावसाळ्यात शहरात नाल्यालगतच्या भागातील पूर परिस्थितीचा आणि सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. शहराबाहेरील रिंगरोडचे कामही वेगाने हाती घेण्यात येत आहे. या रस्त्याच्या भूसंपादनाला १० हजार कोटी रुपये लागणार आहेत. आणि या कामाला प्राधान्य देण्यात येत आहे.
दरम्यान, गेल्या पाच वर्षात महानगरपालिकेने विकासाची बरीच कामे केली. पुण्याचा विकास आराखडा या काळात मंजूर करून पुण्याचा विकासाचा मार्ग मोकळा केला. पुण्याच्या मेट्रोला गती देण्यात आली असून त्याचा एक टप्पा पूर्ण झाला. पुण्यात निर्माण होणाऱ्या मेट्रोच्या जाळ्यामुळे वाहतूकीची कोंडी कमी करण्याचे काम येत्या काळात होणार आहे. पुण्यात पायाभूत सुविधा निर्माण झाल्या तर देशातील इतर शहरांप्रमाणे चांगले वातावरण तयार होईल. आणि पुण्यात माहिती तंत्राज्ञान, मॅन्युफॅक्चरींग आणि नाविन्यतेच्या क्षेत्रात चांगली प्रगती करता येईल.