लोणी काळभोर, (पुणे) : मुंबई येथील शिवतीर्थावर दसरा मेळावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा होणार असल्याने शिवसेनेचे निष्ठावंत २ कार्यकर्ते धाराशिव (उस्मानाबाद) येथून मुंबईच्या दिशेने पायी निघाले आहेत. यावेळी “ईमान भगव्याशी निष्ठा ठाकरेंशी” असे म्हणत दोघांनी भगवा ध्वज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा घेऊन थेट ‘मातोश्री’पर्यंत पदयात्रेला सुरवात केली आहे.
ज्येष्ठ शिवसैनिक भीमा जाधव व बंडू आदरकर हे पायी चाललेल्या दोन शिवसैनिकांची नावे आहेत. धाराशिव ते मुंबई सुमारे ४५० किलोमीटरहून अधिक अंतर आहे. हे शिवसैनिक गुरुवारी (ता.१५) धाराशिवहून निघाले होते. या वारीमध्ये त्यांनी गावोगावी भेटी देऊन शिवसैनिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी हजर राहण्यासाठी शिवसैनिकांना सांगितले आहे.
हडपसर येथे पुणे जिल्हा शिवसेनेच्या वतीने शनिवारी (ता. २४) स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देशमुख, दत्ता खवले, सर्जेराव सूर्यवंशी, सुमित जाधव, अनिकेत सपकाळ, जगन्नाथ मनाळे, परमेश्वर काळे, सागर चव्हाण आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, कुंजीरवाडी येथे दोन्ही शिवसैनिकांचे माजी हवेली तालुका संघटक स्वप्नील कुंजीर यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. २३) सत्कार करून स्वागत करण्यात आले. यावेळी कुंजीरवाडी शिवसेना शाखाप्रमूख भाऊसाहेब कुंजीर, चंद्रकांत कुंजीर, दत्तात्रय कुंजीर, गणेश कुंजीर, सोमनाथ न्हावले, शरद सुर्यवंशी, सुनील न्हावले, पृथ्वीराज कुंजीर आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना ज्येष्ठ शिवसैनिक भीमा जाधव म्हणाले कि, मी गेल्या ३० वर्षापासून शिवसेनेचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे. हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आम्ही खरे सैनिक आहोत. त्यांच्यावरील प्रेमामुळे शिवतीर्थावर चाललो आहे. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या सभेला हजर राहून त्यांचे हात बळकट करणार आहे. आणि आगामी निवडणुकीत गद्दारांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी पहिल्यापेक्षा जास्तपटीने काम करणार आहे.