अजित जगताप
सातारा : मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना काल-आज व उद्या ही कायम राहणार आहे. याची खात्री सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांना दसरा मेळाव्यात पटली आहे.त्यामुळे सातारा जिल्ह्यातील काही शिवसैनिकांना स्वगृही परतण्याचे वेध लागले आहेत.
सातारा जिल्ह्याचे सुपुत्र व सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या बद्दल जिल्ह्याचे सुपुत्र म्हणून भावनिकदृष्ट्या अनेकजण जोडले गेलेले आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन चाळीस शिवसेनेचे आमदार त्यांच्या सॊबत गेले. सातारा जिल्ह्यातील मंत्री शंभूराज देसाई व आ. महेश शिंदे व सध्याचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या मतदारसंघात अनुक्रमे पाटण, कोरेगाव- खटाव व खंडाळा-वाई-महाबळेश्वर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कडवा विरोधाला सामोरी जावे लागत आहे.
त्यातूनच महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीला विरोध करण्यासाठी शिवसेनेच्या बंडात हे तिघेजण सामील झाले आहेत. ही बाब आता लपून राहिलेली नाही. स्थानिक पातळीवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना अशी भविष्यात आघाडी होणार आहे. अशी वेळी सामान्य व महत्वकांक्षी शिवसैनिकांनी पर्याय म्हणून शिंदे गटाला जवळ केले. हा नैसर्गिक नियम आहे. पण, यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेतील पद पुन्हा त्याच व्यक्तींना देऊन सत्तेच्या सावलीत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
मुळातच शिवसेनेची बांधणी ही सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या शिवसैनिकांच्या पायावर उभी राहिली आहे. त्यातूनच संघटनात्मक पदे व नगरसेवक ते खासदार अशी अनेकांनी शिवसेना या शब्दावर मजल मारली आहे. त्यापैकी बऱ्याच शिवसैनिकांना पद जरी मिळाले नाही तरी त्यांनी शिवसेनेवरील निष्ठा कमी पडू दिली नाही. त्याचे ज्वलंत उदाहरण मुंबईतील शिवतीर्थावर झालेल्या दसरा मेळाव्याने दाखवून दिले आहे.
या मेळाव्याने कट्टर समर्थक असलेल्या शिवसैनिकांना परतीचा मार्ग सापडला आहे. खूप मोठा गाजावाजा करून सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांना तसेच हौशे-नवशे-गवशे यांना मुंबई दर्शनाचा लाभ मिळाला.शिंदे गटाकडून साताऱ्यातून जाताना शिरवळ येथील डाळ-भात व येताना वाशी येथे जेवणाचा आस्वाद घेऊनच अनेकांनी घरचा रस्ता धरला.पण,मनातील शिवसेनेचे प्रेम अधिकच उफाळून आले आहे. त्यामुळे जे शिंदे गटाच्या मेळाव्यात सामील झाले होते. त्यापैकी काहींनी सेना भवन ला भेट देऊन आपली चूक सुधारल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत.
याबाबत खटाव तालुक्यातील बाळासाहेब जाधव यांनी सांगितले की,मुख्यमंत्री शिंदे गटाच्या सातारा जिल्ह्यातील काही हाताच्या बोटावर मोजता येतील अशा पूर्वश्रमीच्या शिवसेनेतील व्यवसायिक नेत्यांनीच अनेकांची भ्रमनिरास केली आहे.’ एक हात ढपली व नऊ हात लाकूड ‘ अशी भूमिका घेतल्याने अनेक शिवसैनिक पुन्हा शिवसेनेच्या वाटेवर विराजमान झाले आहेत.ही वस्तुस्थिती समोर आली आहे.
ज्यांना भविष्यात निवडून येण्याची शक्यता नाही. अशी काही मंडळी शिंदे गटाकडे आकर्षित झाली आहेत. मात्र, त्याचा राजकीय फटका त्यांच्या सॊबत जाणाऱ्यांना बसला आहे. अशीच प्रतिक्रिया अनेक शिवसैनिकांनी दिली आहे. सध्याच्या भाजप पक्षाला फोडाफोडी केल्याशिवाय कोणतेही तत्व उरले नाही.त्यामुळे त्या पक्षातील जनसंघ,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मिशीतून तयार झालेले काही निष्ठावंत कार्यकर्ते अस्वस्थ बनले आहेत. अशी उघडपणे चर्चा होऊ लागली आहे.
शिवसेना-भाजप युती झाली तर शिंदे गटाचे अस्तित्व काय? असा ही मार्मिक प्रश्नांची सरबत्ती होताना दिसत आहे. राजकारणात काही ही घडू शकते. म्हणून अशी चर्चा होत आहे. याला दुजोरा सुध्दा दिला जात आहे. एकूणच महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिंदे गटाच्या नवलाईचे दिवस संपले असून स्थानिक भूमीपुत्र म्हणून त्यांच्या सर्वानाच अभिमान वाटत असला तरी काही स्थानिक नेत्यांच्या नाकर्तेपणामुळे काही शिवसैनिकांचा भ्रमनिरास झाला आहे. ही गोष्ट मान्य केली तर शिंदे गटाने शिवसेनेला दिलेला आव्हानात्मक भाषेला राजकीय अभिजात भाषेचा दर्जा मिळेल त्यासाठी आत्मचिंतन केले पाहिजे असा सूर उमटू लागला आहे.
दरम्यान, सच्चा शिवसैनिकांचे नेहमीच स्वागत होत आहे. त्यांनी आमच्याशी फारकत घेतली नव्हती, घेणार सुद्धा नाहीत, उलट अधिक जोमाने ते शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी पूर्वी सारखेच परिश्रम घेतील असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख प्रताप जाधव,युवराज पाटील व खटाव शिवसेना महिला संघटिका सौ राणी विकास काळे यांनी सांगितले आहे.