मुंबई : वरळीत एक धक्कादायक घटना घडली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्याच्या मुलानं आपल्या भरधाव महागड्या बीएमडब्ल्यू कारनं महिलेला चिरडलं आणि तिथून फरार झाला. याप्रकरणी पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्याला ताब्यात घेतलं आहे. तर त्याचा मुलगा फरार मिहीर शहा याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
सत्ताधारी त्यांच्या बगलबच्चांना पाठिंबा देत आहे- नाना पटोले
अपघातातील कार चालक आणि इतरांनी मद्यप्राशन केलं असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. याबाबत आता वाइस ग्लोबल बारचे मालक करण शहा यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. तर दुसरीकडे या प्रकरणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर चांगला निशाणा साधला असून सत्तेमध्ये असलेले लोकांना आणि त्यांच्या बगलबच्चांना हे सरकार पाठिंबा देत आहे. तसेच सामान्य जनतेला चिरडण्याचा अधिकार देखील त्यांना या सरकारने दिलाय, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. ते गोंदिया येथे आले असता माध्यमांशी बोलत होते.
शिखर बँक घोटाळा प्रकरणी एसआयटीच्या मार्फत चौकशी नेमून या बाबत अधिक तपास व्हावा, ही मागणी सर्व स्तरातून होऊ लागली आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप आपल्या खुर्च्या वाकविण्याकरिता घोटाळा करणाऱ्या लोकांना सोबत घेत आहे, आणि त्यातूनच या संदर्भात लोकांच्या मनात उद्रेक निर्माण झाला आहे. नागरिकांकडून देखील एसआयटी चौकशीची मागणी करण्यात येत आहे. मात्र सरकार याबाबत थोडे देखील गंभीर नसल्याची टीका यावेळी नाना पटोले यांनी केली आहे.