राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान : सरपंच, उपसरपंच यासाठीचा शासनाचा स्तुत्य उपक्रम
अजित जगताप
सातारा : भारत सरकारच्या पंचायती राज मंत्रालय व राज्य शासनाच्या यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी तसेच राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाअंतर्गत खटाव तालुक्यातील वडूज येथील छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल येथे ग्रामपंचायत सदस्यांचे क्षमता बांधणी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सेवानिवृत्त अधिकारी सुरेंद्र चव्हाण, सुनिल भस्मे, अमोल जाधव, सचिन शेवाळे यांनी उपयुक्त माहिती देऊन खटाव तालुक्यातील निमंत्रित सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता, २०११तील महत्त्वाच्या तरतूदीबाबत मार्गदर्शन केले.
जिल्हा ग्रामविकास निधीतून कर्ज घेण्याची कार्यपध्दती, कलम ४९ नुसार ग्रामविकास समित्या ग्रामसूची, ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांची कार्यसूची, ग्रामआरोग्य, पोषण, पाणी पुरवठा व स्वच्छता समिती, पाणी टंचाईबाबत ग्रामपंचायतीचे कर्तव्य, नळपाणी पुरवठा योजना, पाणी शुध्दीकरण, महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११:मधील महत्त्वाच्या तरतुदीवर यावेळी चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले.
याचबरोबरीने ग्रामपंचायत १ ते ३३ नमुने (अभिलेखे) शासन खरेदी धोरण, ग्रामपंचायत पातळीवर करावयाची खरेदी प्रक्रिया (गव्हर्नमेंट ई मार्केट) म्हणजे काय? ग्रामपंचायत तपासणीचे अधिकार लेखापरिक्षण, पेसा कायदा आणि आदिवासींचा विकास, जैवविविधता व्यवस्थापन समिती, शाश्वत विकासाची ध्येय उपस्थितांनी आपले विचार मांडले.
वॉर्डसभा, महिला सभा, ग्रा.प.सभा, ग्रामसभा ग्रामपंचायत- काल, आज व उद्या, इतिहास, सद्यस्थिती व भवितव्य ग्रा.प.उत्पन्न आणि उत्पन्न वाढीसाठी उपाय ग्रा.प. अधिनियमातील महत्वाच्या तरतूदी कलम ४५ व ४९,लेखासंहिता आणि १ ते ३३ नमुने,सरपंचाचे अधिकार व त्या अनुषंगाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात बदल झाले आहेत.
सरपंच व उपसरपंच निवडणूक सरपंच/ उपसरपंच / सदस्य जबाबदाऱ्या व कर्तव्ये, सरपंच मानधन व सदस्य बैठक भत्ता सरपंच समिती, ग्रामसभा, मासिक सभा, सामाजिक लेखा परिक्षण समिती ग्रामपंचायतींची विविध बँक खाती, पंचायतीचे अंदाजपत्रक, पंचायत : अर्थसंकल्पाच्या बाबी ग्रामपंचायत उत्पन्नाच्या बाबी ,पंचायतीने कर व फी आकारणी करणे,ग्रामपंचायतीस बंधनकारक असणारा खर्च,अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांचे वस्तीचा विकास योजना,अतिक्रमण सरपंच, उपसरपंच, सदस्य निरर्हता (अपात्रता) अविश्वास प्रस्ताव याबाबत प्रोजेक्टर यंत्रणेच्या सहाय्याने माहिती देण्यात आली. तसेच उपयुक्त पुस्तकाचे मोफत वाटप करण्यात आले.
या प्रशिक्षणासाठी अंभेरी, नांदोशी, पारगाव, पुसेसावळी, कळंबी, रेवली, तडवळे येथील आमंत्रित पन्नास सरपंच, उपसरपंच, सदस्य उपस्थित होते.