पुरंदर : राष्ट्रवादीने शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळू दिला नाही, तसेच सर्व निधी हा राष्ट्रवादीच्याच आमदारांना दिला. त्यामुळे राष्ट्रवादीने राज्याची तिजोरी गिळून टाकल्याचा आरोप सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांना केला आहे.
सासवड (ता. पुरंदर) येथे पुरंदर हवेली मतदार संघातील प्रलंबित प्रकल्पांच्या सोडवणुकीसाठी मुख्यमंत्री आपल्या दारी व शेतकरी जनसंवाद मेळाव्याचे आयोजन मंगळवारी (ता.२) करण्यात आले होते. यावेळी बोलताना वरील आरोप आमदार शहाजी पाटील यांनी केला आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, आमदार तानाजी सावंत, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना पाटील म्हणाले कि, अडीच वर्षांच्या काळात एक नगरविकास विभाग सोडला तर आम्हाला दुसरीकडे कुठे निधी मिळत नव्हता. मी आजवर कोणाची चमचेगिरी केली नाही. पण एक निक्षून सांगतो की यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण आणि वसंतदादा पाटलांनंतर कोणाचं नेतृत्व पटलं असेल तर ते एकनाथ शिंदे यांचे आहे. अत्यंत बारकाईने अभ्यास करुन मी वक्तव्य केले. लहानपणापासून या माणसानं अपार कष्ट केले. आनंद दिघे भेटल्यानंतर माणसाची दिशा बदलली आणि आज मुख्यमंत्रीपदापर्यंत येवून थांबलेले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार घराघरात पोहचवायचे आहेत. एक एक करून आमदार गेलेत, शिंदे साहेब कधी गेलेत एकालाही कळलं नाही, तुमचं सीआयडी खातं काय करत होतं? असा सवालही त्यांनी गेल्या सरकारला केला आहे. तर आम्ही जे केलं शिवसेना वाचवण्यासाठी केलं, बाळासाहेब ठाकरे आणि दिघे साहेबांचे विचार लोकांपर्यंत पोचवण्यासाठी केलं. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर कुठला मुख्यमंत्री लाभला असेल तर ते एकनाथ शिंदे असे म्हणत त्यांनी शिंदेंचं कौतुक केले आहे. तसेच आम्हीही मेलेल्या आईच दूध पिलो नाही, आम्ही पण ठोका देणारच, असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला आहे.