राहुलकुमार अवचट
यवत : यवत (ता. दौंड) परिसरातील खंडित केलेला वीज पुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिजाऊ ब्रिगेड आणि विविध संघटनानी महावितरणला दिला आहे. यावेळी यवत सहाय्यक अभियंता पी. एन. काकडे यांना यासंदर्भातील निवेदन दिले आहे.
महावितरणच्या वतीने यवत परिसरात अनेकांचा विज पुरवठा बंद केला आला असुन त्यामुळे सामान्य लोकांना व जनावरांना पिण्याचे पाणी मिळत नाही , काहींची घरे रानात असून त्यांना पिण्यासाठी व आंघोळीलाही पाणी नाही.
केडगाव व यवत अधिकारी यांनी सामान्य लोकांना, जनावरांना तसेच शेतीला पाणी मिळण्यासाठी विज लवकरात लवकर चालू करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
गेल्या पाच दिवसांपासून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे खूप हाल असुन काहींची पीक जळून गेले आहेत तर काहींनी विजबिले पूर्णपणे भरलेली असूनही विज मिळत नाही याबाबतीत २ दिवसात योग्य तो निर्णय न घेतल्यास जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, समता परिषद, वंचित बहुजन आघाडी, मातंग नवनिर्माण सेना, झोपडपट्टी सुरक्षा रक्षक दल, शरदचंद्रजी पवार साहेब विचार मंच आणि शेतकरी वर्गाच्या वतीने कार्यालयातील पाण्याने आंघोळ करुन ब्रिगेडी स्टाईलने आंदोलन करु असा इशारा दिला आहे.
यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा सारीका भुजबळ , संभाजी ब्रिगेड जिल्हा संघटक भरत भुजबळ, सल्लागार बबन गायकवाड, समता परिषद दौंड कार्याध्यक्ष मंगेश रायकर, वंचित बहुजन आघाडीचे बापू जगताप, आम आदमी पार्टी दौंड युवा अध्यक्ष पोपट लकडे, सामाजिक कार्यकर्ते निलेश शेंडगे, उमेश म्हेत्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.