शनिवारी टेंभुर्णी येथे आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन केले प्रतिपादन
प्रतिनिधी -राजेंद्र गुंड-पाटील
माढा : क्रांतिअग्रणी डॉ. डी जी बापू लाड यांचे देशाच्या स्वातंत्र्यासाठीचे व सहकार क्षेत्रातील योगदानाबरोबरच सर्वच क्षेत्रातील कार्य आजच्या पिढीसाठी स्फूर्तीदायी व प्रेरणादायी असून त्याचा अंमल आणि आचरण आजच्या पिढीने करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार बबनदादा शिंदे यांनी केले आहे. टेंभुर्णी ता.माढा येथे विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय व विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळाच्या संयुक्त वतीने क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शनिवारी 22 ऑक्टोबर रोजी आयोजित व्याख्यानाच्या वेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेंद्र कदम यांनी केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.राजेंद्र दास यांनीही विचार व्यक्त केले.
पुढे बोलताना आमदार बबनदादा शिंदे म्हणाले की, डॉ. डी.जी बापू लाड यांचे सांगली,सातारा,कोल्हापूर या भागात मोलाचे कार्य आहे.आपल्या मागच्या पिढीतील लोकांनी नेमके काय कार्य केले, त्यांनी कोणत्या गोष्टींचा त्याग केला हे आजच्या पिढीला समजावे या उद्देशाने हा उपक्रम राबविला आहे. त्यांनी लष्करी प्रशिक्षण शाळा सुरू केल्या, रोजगार हमी योजना, सहकारी साखर कारखाने सुरू केले,विविध चळवळी व आंदोलनात सहभाग घेऊन देशासाठी व समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार अरुण लाड म्हणाले की, क्रांतिअग्रणी जी.डी. बापू लाड यांनी कमी वयात केलेले कार्य प्रेरणादायी आहे. सातारा येथे प्रतिसरकारची स्थापना करून ब्रिटिश सरकारच्या विरोधात प्राणाची पर्वा न लढा दिला.अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची त्यांची उर्जा आजच्या पिढीने आत्मसात केली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले
यावेळी इचलकरंजीचे वक्ते प्रसाद कुलकर्णी म्हणाले की, आज सामाजिक मूल्यांवर हल्ले होत आहेत. तरुण पिढी अस्वस्थ आहे. स्वातंत्र्यवीरांच्या स्वप्नातील भारत वेगळा होता परंतु आज मात्र वेगळे चित्र दिसत आहे याची खंत त्यांनी व्यक्त केली.कोणत्याही आंदोलनाला प्रेरणा व नेतृत्व असावे लागते हे आपणास इतिहासातून शिकायला मिळते.
ब्रिटिश सरकारकडून होत असलेले भारतीयांचे आर्थिक शोषण व पिळवणूक, गुन्हेगारी, सावकारी पाश आदी विघातक गोष्टीविरुद्ध लढण्यासाठी साताऱ्यात प्रतिसरकारची स्थापना झाली. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात साताऱ्याचे प्रतिसरकार हे एक तेजस्वी पर्व होते.त्या प्रतिसरकारमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील, नागनाथ आण्णा नायकवाडी व क्रांतीअग्रणी डॉ. जी.डी बापू लाड यांनी अतिशय मोलाची भूमिका बजावली. मध्यवर्ती युद्धमंडळ, न्यायदान मंडळ, लष्करी प्रशिक्षण केंद्र, जनता कोर्ट, तुफान दल,चवळीसाठी निधी उभारण्यासाठी खजिना लूट, दारूबंदी,अस्पृश्यता निर्मूलन, ग्रामस्वच्छता या क्षेत्रात योगदान दिले.
अतिशय संघर्षशाली जीवन क्रांतीअग्रणी बापू जगले.एक धगधगता इतिहास त्यानी निर्माण केला.क्रांतीच्या मशालीने साम्राज्यवादी अंधार दूर करण्याचा प्रयत्न अखेरपर्यं ते करीत राहिले.देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात प्राणाची पर्वा न करता सहभागी झालेल्या बापूंची ‘महाराष्ट्राचे शिल्पकार ‘ या मालिकेतही आदराने नोंद घेतली जाते.
सर्वसामान्य जनतेसाठी सरकारने कशी धोरणे राबवली पाहिजेत याचे उदाहरण स्वातंत्र्यपूर्व काळात प्रतिसरकारच्या माध्यमातून ,स्वातंत्र्य आंदोलनातून आणि स्वातंत्र्योत्तर काळात,शेती, पाणीपुरवठा,शिक्षण,सहकार, कष्टकरी, कामगार क्षेत्रासह विविध क्षेत्रातील कार्यातून त्यांनी दाखवून दिल्याने त्यांना कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या वतीने डॉक्टरेट दिली आहे.शेवटी प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले की,आज बरेचसे लोक खरं बोलण्यापेक्षा बरं बोलणं पसंत करतात परंतु हे समाजहितासाठी योग्य नाही.
सुत्रसंचालन रविंद्र जाधव, प्रा.दिगंबर वाघमारे ,कवी संजय साठे यांनी केले.आभार राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा विधानसभा अध्यक्ष रमेश पाटील यांनी मानले .
यावेळी जिल्ह्याचे नेते आमदार संजयमामा शिंदे,विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे व्हा.चेअरमन वामनभाऊ उबाळे,मार्केट कमिटीचे उपसभापती सुहास पाटील,माढा वेलफेअर फाऊंडेशनचे अध्यक्ष धनराज शिंदे, जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे, शिवाजी पाटील,आप्पासाहेब उबाळे,संजय पाटील- भिमानगरकर, माजी उपसभापती तुकाराम ढवळे, बाळासाहेब पाटील,विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे कार्यकारी संचालक डिग्रजे साहेब,प्राचार्य सुभाष नागटिळक,माजी उपसभापती उल्हास राऊत,संचालक प्रभाकर कुटे,रमेश येवले-पाटील ,वेताळ जाधव,राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रामभाऊ शिंदे,शिवाजी डोके,संभाजी पाटील,मुख्याध्यापक महादेव सुरवसे, मुख्याध्यापक हनुमंत खापरे, मुख्याध्यापक हनुमंत आलदर, मुख्याध्यापक हरिदास ढगे, मुख्याध्यापक प्रवीण लटके,आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड,विजय उपासे, पिंटू नागटिळक,महेश नागटिळक यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.