मुंबई : महाराष्ट्रात झालेल्या दुसऱ्या शपथविधीनंतर अजित पवार उमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. महाराष्ट्रासाठी हा एक राजकीय भूकंप ठरला आहे. त्यानंतर अनेक विधानं, आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. त्यात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक विधान केले आहे.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलणे टाळले. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारच्या कामाचे त्यांनी कौतुक केले. त्यांच्यासोबत शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे काही नेतेही उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन व्हावे, अशी सर्वसामान्यांच्या मनात होते. तेच आम्ही वर्षभरापूर्वी केले. बाळासाहेबांच्या, दिघेसाहेबांच्या आदर्शावर, त्यांनी दिलेल्या शिकवणीवर आम्ही पुढे जात आहोत. बाळासाहेब नेहमी सर्वसामान्यांच्या पाठिशी नेहमी उभे राहायचे, हे सरकारदेखील सर्वसामान्यांच्या पाठिशी उभे आहे’.
हे सरकारसुद्धा बाळासाहेबांच्या आशीर्वादाने
आज आम्ही सर्व इथे बाळासाहेब ठाकरेंना वंदन करायला आलो आहोत. हे शक्तिस्थळ आहे. प्रेरणास्थळ आहे. इथे आल्यानंतर उर्जा मिळले, प्रेरणा मिळते. हेच आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलंय. हे सरकारसुद्धा बाळासाहेबांच्या आशीर्वादाने सुरू आहे. त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही वर्षभरापूर्वी त्यांच्या विचारांचे सरकार स्थापन केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.