Elvish Yadav: नोएडा: बिग बॉस ओटीटी- 2 विजेता आणि युट्युबर एल्विश यादव आणि त्याच्या इतर पाच सहकाऱ्यांविरुद्ध साप तस्करी प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. नोएडा पोलिसांनी हा एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 20 मिली सापाचे विष आणि 9 विषारी सापही जप्त केले, जे रेव्ह पार्ट्यांसाठी वापरले जात होते. त्याच्यावर वन्यजीव संवर्धनाच्या गुन्ह्याखाली कारवाई करण्यात आली आहे.
त्याचवेळी पोलिसांचे म्हणणे आहे की, ते एल्विशशी संपर्क करू शकत नाहीत. एल्विशच्या शोधात पोलिसांचे पथक छापे टाकत आहे. सध्या तीन राज्यांत छापेमारी सुरू आहे. त्यांच्याकडून जप्त केलेले विष एसएसएलकडे तपासासाठी पाठवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून पाच कोब्रा, एक अजगर जप्त केला आहे. या सर्व सापांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आरोप निराधार असल्याचे म्हटले
दरम्यान, एल्विश यादव यांच्या बाजूनेही स्पष्टीकरण समोर आले आहे. आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप निराधार असल्याचे एल्विशचे म्हणणे आहे. या आरोपांमध्ये एक टक्काही तथ्य नाही. जे काही आरोप झाले आहेत त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. त्याचवेळी एल्विश यादवने सापांसाठी राहुल यादव नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधल्याचे सांगण्यात येत आहे. एल्विश यादवला लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
दोन ते पाच वर्षांपर्यंत शिक्षा
त्याचवेळी उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री अरुण कुमार सक्सेना यांनी म्हटले आहे की, एल्विशवर दाखल झालेल्या गुन्ह्यात दोन ते पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे. कायदा आपले काम करत असल्याचे ते म्हणाले. सध्या अटक करण्यात आलेल्या पाच जणांवर कारवाई सुरू आहे. या प्रकरणाशी एल्विशचाही संबंध असल्याची माहिती पोलिसांनी नुकतीच अटक केलेल्या पाच जणांनी पोलिसांना दिली आहे.