नवी दिल्ली: हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांचा राजकीय प्रवास सुरू झाला आहे. दोन्ही स्टार पैलवान काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. बजरंग पुनिया आणि विनेश फोगट पहिल्यांदा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटायला आले, त्यानंतर दोघेही काँग्रेस मुख्यालयात पोहोचले आणि पक्षात प्रवेश केला.
ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणारे बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांचे फोटो काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत फोटो समोर आले, त्या वेळी पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपालही उपस्थित होते. यावेळी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोशल मीडिया हँडल X वर पोस्ट करत म्हटले की, चक दे इंडिया, चक दे हरियाणा! आमच्या प्रतिभावान चॅम्पियन विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांना भेटलो, ज्यांनी जगात भारताचा गौरव केला आहे, आम्हाला तुम्हा दोघांचा अभिमान आहे.
यावेळी काय म्हणाली विनेश फोगट?
यावेळी विनेश फोगट म्हणाली की, मी काँग्रेस पक्षाचे आभार मानते. वाईट वेळी आमचे कोण आहे हे कळते, आम्हाला रस्त्यावर ओढले जात असताना भाजप वगळता सर्व पक्ष आमच्या सोबत होते आणि आमचे दुःख समजून घेऊ शकले. मला खूप अभिमान वाटतो की, मी अशा पक्षात आहे, जो महिलांवरील अन्याय आणि गैरवर्तनाच्या विरोधात उभा आहे आणि रस्त्यावरून संसदेपर्यंत लढायला तयार आहे. ती पुढे म्हणाली, आम्ही स्वत:ला असहाय समजणाऱ्या महिलेच्या पाठीशी उभे आहोत, कुस्तीमध्ये मी जास्तीत जास्त महिलांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला आहे.
मला हवे असते तर मी जंतरमंतरवरही कुस्ती सोडू शकले असते, असे विनेश फोगट म्हणाली. भाजप म्हणाले की, मला नॅशनल खेळायचे नाही, मी नॅशनल खळले, ते म्हणाले मला ट्रायल्स देऊन जायचे नाही, मी ट्रायल दिली. ते म्हणाले मला ऑलिम्पिकला जायचे नाही, मी ऑलिम्पिकला गेले आणि फायनलपर्यंत पोहचले.
राहुल गांधी यांची भेट घेतली होती
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणारी विनेश फोगट आणि सलग तीन प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारा बजरंग पुनिया यांनी बुधवारी पक्षाचे दिग्गज नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. राहुल गांधींसोबत कुस्तीपटूंची ही भेट 15 मिनिटे चालली. या भेटीनंतरच हे दोन्ही पैलवान काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात, अशी अटकळ बांधली जात होती, ती खरी ठरली.
काय म्हणाले भाजप?
हरियाणा विधानसभेचे अध्यक्ष आणि पंचकुला विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार ज्ञानचंद गुप्ता म्हणाले की, दोन्ही कुस्तीपटूंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी निवडणूक लढवायची की नाही, ही त्यांची वैयक्तिक निवड आहे. बजरंग पुनिया हा देखील खूप चांगला पैलवान होता.
ते पुढे म्हणाले, खेळ आणि राजकारण या वेगळ्या गोष्टी आहेत, जर विनेश फोगटने ठरवले असेल की तिची क्रीडा कारकीर्द संपली आहे, तर आम्ही तिच्या राजकारणात प्रवेश करण्याच्या निर्णयाचे स्वागत करतो. मला आशा आहे की, हे दोघेही राजकारणासाठी काहीतरी चांगले करतील.
काय म्हणाली साक्षी मलिक?
बजरंग पुनिया आणि विनेश फोगट हे भाजपचे तत्कालीन भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात दिल्लीच्या रस्त्यावर उतरले. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप झाले होते. या आंदोलनात विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि कुस्तीपटू साक्षी मलिक यांचाही सहभाग होता.
बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी राजकारणात प्रवेश केल्याच्या निमित्ताने साक्षी मलिक म्हणाली, राजकीय पक्षात प्रवेश करणे ही त्यांची वैयक्तिक निवड आहे. आमचे आंदोलन हा महिलांसाठीचा लढा आहे, त्याला दुसरे रूप देऊ नये. माझ्या बाजूने आंदोलन सुरूच आहे, असेही ती म्हणाली. मला ऑफरही आल्या होत्या, जोपर्यंत फेडरेशन स्वच्छ होत नाही आणि महिलांचे शोषण थांबत नाही, तोपर्यंत माझा लढा सुरूच राहील.
विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी केली, तिने सलग तीन कुस्तीपटूंना पराभूत केले आणि अंतिम फेरी गाठली, त्यानंतर ती भारतासाठी सुवर्णपदक मिळवून देईल अशी सर्वांना अपेक्षा होती, परंतु वजन थोडे जास्त असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले आणि तिचे पदक हुकले.
बजरंग पुनिया आणि विनेश फोगट 2023 मध्ये भाजपचे तत्कालीन भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते. ब्रिजभूषण यांच्यावर झालेल्या लैंगिक छळाच्या आरोपांविरोधात या दोघांनीही दिल्लीच्या रस्त्यावर निदर्शने केली होती, त्यावेळी या कुस्तीपटूंना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा मिळाला होता, त्यानंतर आता या दोन्ही कुस्तीपटूंनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.