पालघर: महिलेचे कापलेले शिर सुटकेसमध्ये आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पालघर जिल्ह्यात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. विरार परिसरातील पिरकुंडा दर्ग्याजवळ गुरुवारी संध्याकाळी हा प्रकार उघडकीस आला होता. परिसरात लहान मुले खेळत असतांना त्यांना हि सुटकेस नजरेस पडली. दरम्यान, सुटकेसमध्ये काय असणार या उत्सुकतेपोटी त्यांनी उघडून पहिले असता त्यांना एका महिलेचा कापलेला शिर दिसला. दरम्यान, त्यांनी हि माहिती घरी सांगितली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर हत्येचा उलगडा करण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून पुरावे गोळा करून फॉरेन्सिक तज्ञांनी घटनास्थळाला भेट देऊन नमुने गोळा केले आहेत. महिला कोण असून तिची हत्या का करण्यात आली याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना समोर आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नालासोपारा येथे रविवारी हि घटना घडली होती.सर्वजण तिचे लाड करतात या भावनेने एका 13 वर्षीय भावाने 6 वर्षीय चिमुकलीची सिरीयल किलरबद्दलच्या हिंदी चित्रपटातून प्रेरणा घेऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली आहे.







