जमुई: बिहारमधील जमुई जिल्ह्यात पतीला सोडून प्रियकरासह पळून जाणे एका महिलेला महागात पडले. आठवडाभरानंतर ती महिला पतीकडे परतली, तेव्हा गावकऱ्यांनी महिलेला तसेच तिच्या पतीला तालिबानी शिक्षा दिली. गावकऱ्यांनी महिला आणि तिच्या पतीला अर्धनग्न केले, त्यांना चप्पलांचा हार घालून ढोल-ताशांच्या गजरात गावात फिरवले. यावेळी महिलेचे केसही कापण्यात आले. सदर पती-पत्नीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. गावातील काही महिला संबंधित महिलेचे केस कापून तिची साडी काढत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
हे प्रकरण जमुई जिल्ह्यातील झाझा पोलीस स्टेशन क्षेत्रातील ताराकुरा गावातील आहे. आठवडाभरापूर्वी ही महिला तिच्या प्रियकरासह पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या सोमवारी सायंकाळी उशिरा ही महिला आपल्या पतीकडे घरी परतली, तेव्हा गावकऱ्यांनी गावात बैठक घेऊन महिला, तिचा पती आणि प्रियकराला चप्पल घालून अर्धनग्न करून गावातून धिंड काढण्याचा निर्णय घेतला.
महिलेचा प्रियकर फरार
गावकऱ्यांच्या या निर्णयाची कल्पना मिळताच महिलेचा प्रियकर केदार मंडल पळून गेला. त्यानंतर ग्रामस्थांनी महिलेला आणि तिच्या पतीला अर्धनग्न करून चप्पलचा हार घालून ढोल-ताशांच्या गजरात सोमवारी रात्री गावात धिंड काढली. महिला आणि तिचा प्रियकर दोघेही विवाहित असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. दोघांनाही प्रत्येकी तीन मुले आहेत, तरीही दोघेही एकमेकांसोबत पळून गेले.
पोलिसांनी 12 जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला
दोघेही सात दिवसांनी परतल्यावर गावकऱ्यांनी विरोध सुरू केला. या लोकांनी समाज कलुषित करण्याचे काम केल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळेच ही शिक्षा देण्यात आली आहे. या संदर्भात झाझा पोलिस ठाण्याचे प्रभारी संजय सिंह यांनी सांगितले की, या घटनेची माहिती मिळाली आहे. पीडितेच्या अर्जावरून १२ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील कारवाईत गुंतले आहेत.