नवी दिल्ली: सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वर्षाच्या सुरुवातीला सोन्याने विक्रमी पातळी गाठली होती. प्रति तोळा जवळपास पावणे दोन लाख रुपयांपर्यंत पोहोचलेल्या दरामुळे सर्वसामान्य ग्राहकांना सोने खरेदी करणे कठीण झाले होते. मात्र, आता आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या विक्रीमुळे सोन्याच्या किमती खाली येत आहेत.

जागतिक बाजारात वर्षाच्या सुरुवातीला सोन्याचा भाव प्रति औंस 5,500 डॉलरच्या पुढे गेला होता. मात्र, आता तो 4,000 डॉलरच्या खाली आला आहे. 2026 मध्ये आतापर्यंत सोन्याच्या किमतीत 8 टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली आहे. आगामी काळातही ही घसरण कायम राहू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
ताज्या अहवालात सोन्याच्या किमतीबाबत महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 3,500 डॉलरपर्यंत खाली येऊ शकतो. सध्याच्या 3,947 डॉलरच्या तुलनेत ही जवळपास 11 टक्क्यांची घसरण असेल.

भारतात सध्या 10 ग्रॅम सोन्याचा दर अंदाजे 1.39 लाख रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीत अपेक्षित घसरण झाल्यास भारतीय बाजारातही सोन्याचे दर कमी होऊ शकतात. या अंदाजानुसार, 10 ग्रॅममागे सुमारे 15,290 रुपयांची घट होऊन भाव 1.23 लाख रुपयांच्या आसपास पोहोचण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अमेरिकेतील निवडणुका, बेरोजगारीची आकडेवारी आणि रोजगारविषयक अहवाल यांचाही सोन्याच्या दरावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात सोन्याच्या किमती कोणत्या दिशेने जातात, याकडे ग्राहक आणि गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.







