पुणे : लोणावळ्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या टायगर पॉइंटवर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 20 वर्षीय तरुण अचानक बेपत्ता झाल्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस आणि बचाव पथकाने मोहीम सुरू केली. अखेर सुमारे 400 फूट खोल दरीत या तरुणाचा मृतदेह आढळला. अनिकेत भीमा साबळे (वय 20, रा. रामनगर, भुशी, लोणावळा) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 1 नोव्हेंबरच्या रात्री अनिकेत टायगर पॉइंट परिसरात एका झाडाजवळ उभा होता. मात्र, काही वेळानंतर तो अचानक दिसेनासा झाला. बराच वेळ शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा न लागल्याने तो दरीत कोसळल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
रात्रीच्या वेळी अंधार आणि मुसळधार पाऊस असल्यामुळे तातडीने दरीत उतरणे धोकादायक होते. त्यामुळे शिवदुर्ग मित्र बचाव पथकाने 2 नोव्हेंबर रोजी सकाळी शोधमोहीम राबवण्याचा निर्णय घेतला.

सोमवारी सकाळी लोणावळा ग्रामीण पोलीस आणि शिवदुर्ग मित्रचे आपत्कालीन बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पथकातील सदस्यांनी सुमारे 400 फूट खोल दरीत उतरून शोध सुरू केला. जवळपास अडीच तास शोध घेतल्यानंतर अनिकेतचा मृतदेह आढळला. दोरखंड आणि स्ट्रेचरच्या मदतीने मृतदेह दरीतून वर आणून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.

दरम्यान, अनिकेतचा मृत्यू अपघातामुळे झाला की त्याने आत्महत्या केली, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. लोणावळा ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.






