पुणे : हुंडा आणि मुलाच्या अपेक्षेवरून विवाहितेचा छळ झाल्याचा गंभीर आरोप पुण्यातील एका प्रकरणातून समोर आला आहे. मुकुंद नगर परिसरात राहणाऱ्या 29 वर्षीय पायल पवार-झांबरे हिचा 1 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. पायलच्या माहेरच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर पैशांसाठी, सोन्यासाठी तसेच मुलगी झाल्यामुळे मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती अक्षय झांबरे याला अटक केली असून न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सासू, सासरे आणि नणंद यांच्यावरही आरोप असून ते अद्याप फरार असल्याची माहिती आहे.

पायलच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, मुलगी जन्माला आल्यानंतर सासरच्या मंडळींनी नाराजी व्यक्त केली होती. तिला माहेरीच राहण्यास सांगण्यात आले होते. जवळपास वर्षभर पायल माहेरी होती. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी सासरच्या लोकांची भेट घेऊन तिला पुन्हा नांदवून घेण्याची विनंती केली.
पायलला पुन्हा सासरी घेऊन जाण्यासाठी तिच्या माहेरच्या मंडळींनी अनेकदा प्रयत्न केले. यासाठी त्यांनी सासरच्या लोकांच्या भेटी घेऊन समजूत काढण्याचाही प्रयत्न केला. गरज पडल्यास आणखी पैसे आणि वस्तू देण्याची तयारी दर्शवूनही पायलला नांदवून घेण्याची विनंती केली होती, अशी माहिती तिच्या भावाने दिली. मात्र, तरीही तिचा छळ थांबला नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. अक्षयची बहीण घरी आल्यानंतर तीदेखील पायलला मारहाण करत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. प्रत्येक सणाला सोनं, चांदीची भांडी आणि महागड्या वस्तूंची मागणी केली जात असल्याचा आरोपही तिच्या नातेवाईकांनी केला आहे.

पायल ही सॉफ्टवेअर इंजिनिअर होती. 2019 मध्ये तिचे अक्षयशी लग्न झाले होते. लग्नावेळी माहेरच्या कुटुंबाने 50 तोळे सोने दिले आणि सुमारे 80 लाख रुपये खर्च केल्याचा दावा करण्यात आला आहे. 2023 मध्ये मुलगी झाल्यानंतर तिचा छळ वाढल्याचा आरोप आहे. वडिलांच्या संपत्तीतील वाटा मागण्यासाठीही तिच्यावर दबाव टाकला जात होता, असे कुटुंबीयांनी सांगितले. तिने छळ सहन केला, पण आमची मुलगी त्यांनी खाल्ली, गिळली, अशी हळहळ पायलच्या आईने व्यक्त केली.

1 नोव्हेंबरच्या रात्री पायलने भावाला सासू जबाबदार असल्याचा संदेश पाठवला होता. त्यानंतर तिचा फोन बंद झाला. दुसऱ्या दिवशी नातेवाईक चौकशीसाठी घरी गेले असता पायलचा गळफास घेतलेला मृतदेह आढळला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.







