दौंड : शासकीय स्टॅम्प पेपरवर तालुका कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचे बनावट गोल शिक्के मारून तसेच त्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून बनावट प्रतिज्ञापत्रे तयार करून विक्री केल्याचा प्रकार दौंड तालुक्यातील काळेवाडी येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यातऑनलाइन सेंटर चालकावरगुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्ञानेश्वरी ऑनलाइन सेंटरचा चालक सागर बाळासो काळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वर्षाराणी साधू दळवी (वय 43, व्यवसाय मंडल अधिकारी, रा. शिवाजीनगर, दौंड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. काळेवाडी येथे हा प्रकार , 4 नोव्हेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सागर काळे याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्याच्या मालकीच्या ज्ञानेश्वरी ऑनलाइन सेंटरमध्ये येणाऱ्या ग्राहकांना तसेच त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींना शासकीय स्टॅम्प पेपरवर तालुका कार्यकारी दंडाधिकारी, दौंड यांच्या नावाचे बनावट गोल शिक्के मारून आणि खोट्या स्वाक्षऱ्या करून प्रतिज्ञापत्रे तयार करून दिल्याचा आरोप आहे.

ही बनावट प्रतिज्ञापत्रे खरी असल्याचे भासवून त्यांची विक्री करत शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 336(2), 336(3) आणि 340(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी करीत आहे








