गुजरात : गुजरातमध्ये एक आश्चर्यचकारक घटना घडली आहे. कार अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्याने एका व्यक्तीनं स्वत:विरोधातच गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची नर्मदा जिल्ह्यात तुफान चर्चा सुरु आहे. पत्नीच्या निधनानंतर दु:खी झालेल्या नवऱ्यानं पोलिस स्टेशनमध्ये जात स्वत:विरोधातच गुन्हा दाखल केला आहे. परेश दोशी असं त्या व्यक्तीचं नाव आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, गाडी चालवत असताना माझ्याकडून चूक झाली. श्वानाला धडकणारी कार अचानक वळवल्यामुळे कार डिव्हायडरला धडकली. त्यामुळे पत्नीचं निधन झालं. माझ्या चुकीमुळे पत्नीचं निधन झालं. त्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल करतोय, असं ५५ वर्षीय परेश दोशी यांनी पोलिसांना सांगितलं आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु झाला आहे.
नेमक काय घडलं ?
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, परेश दोशी यांनी पोलिसांना सांगितलं की, ते पत्नी अमितासोबत रविवारी सकाळी अंबाजी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन झाल्यानंतर घरी येत असताना साबरकांडा येथे खेरोज-खेडब्रह्मा राज्य महामार्गावर दान महुदी गावांजवळ एक श्वान गाडीच्या समोर आला. त्यामुळे लक्ष विचलीत झालं. त्या श्वानाला वाचवण्याच्या प्रयत्नात गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या डिव्हायडरला तसेच पोलला जोरात धडकली. त्यानंतर कारचा दरवाजा ऑटो लॉक झाला. त्यामुळे दोघेही गाडीतच अडकले, असं दोशी यांनी पोलिसांना सांगितलं.
अपघात झाल्यानंतर उपस्थित असणाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेत लोकांनी दोशी दाम्पत्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र, दरवाजा उघडला नाही. त्यानंतर काही जणांनी गाडीच्या दरवाजाची काच फोडून दोघांनाही बाहेर काढलं आणि रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण पत्नीचं निधन झालं. या कारणामुळे दोशी यांनी स्वत:वरच गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.