पुणे : भारतीय उद्योग जगताला आकार देणारे आणि टाटा ग्रुपचे प्रमुख रतन टाटा यांचे काल (9 ऑक्टोबर 2024)वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटा यांच्या निधनानंतर भारताच्या उद्योग क्षेत्रातील सच्चा माणूस हरवला असल्याची भावना सर्वत्र दिसून येत आहे. रतन टाटा यांच्या जीवनावर बेतलेल्या अनेक प्रेरणादायी गोष्टी आहेत. त्यातच आता रतन टाटा यांनी एका अपमानाचा बदला घेतल्याचा किस्सा सध्या खूपच चर्चेत येत आहे. नेमका हा किस्सा काय आहे? ते आपण जाणून घेऊया.
रतन टाटा यांनी देशप्रेमासाठी इंडिका नावाची गाडी बाजारात आणली. पण ही कार भारतीय बाजारात फारशी चमक दाखवू शकली नसल्यामुळे टाटा मोटर्सला मोठा आर्थिक फटका बसला होता. यानंतर टाटांना अनेक सहकार्यांनी विभाग बंद करण्याचा सल्ला देखील दिला होता. रतन टाटा यांनाही हा सल्ला पटला होता. त्यानंतर त्यांनीही १९९९ टाटा मोटर्स विकण्याचा निर्णय घेतला. यानंतर रतन टाटा हे अमेरिकेतील फोर्ड कंपनीच्या मालकाला भेटण्यासाठी गेले होते.
यावेळी फोर्ड कंपनीचा मालक आणि रतन टाटा यांची भेट घेतली. त्या दोघांमध्ये तीन तास चर्चा झाली होती . या चर्चेनंतर फोर्ड कंपनीकडून असे सांगण्यात आलं की, जर तुम्हाला कारमधलं काहीही कळत नसेल तर मग तुम्ही अशी कंपनी सुरुच कशाला करायची. जर आम्ही ही कंपनी विकत घेतली तर हे तुमच्यावर खूप मोठे उपकार असतील, असे फोर्डकडून सांगण्यात आले होते. हे ऐकल्यानंतर टाटांना ते खूप अपमानास्पद वाटले होते.
जॅग्वार, लँड रोव्हर या कार कंपन्या विकत घेतल्या
या प्रकारानंतर त्यांनी कार प्रोडक्शन विभाग खूप मेहनतीने आणि लक्षपूर्वक चालवण्याचा निर्णय घेतला. यानंतर २००८ पर्यंत टाटांचा वाहन निर्मिती व्यवसाय प्रचंड मोठा झाला होता. 2008 साली अमेरिकेमध्ये मंदीची मोठी लाट आली होती. या लाटेत फोर्डला मात्र मोठा फटका बसला. फोर्ड कंपनीवर जॅग्वार आणि लँड रोव्हर या कंपन्या विकण्याची वेळ फोर्डवर आली होती. जॅग्वार, लँड रोव्हर या अलिशान कार कंपन्या विकत घेण्यासाठी टाटांनी बिल फोर्ड यांना ऑफर दिली होती.
यावेळी रतन टाटांसोबत बैठक घेण्यासाठी बिल फोर्ड अमेरिकेतून भारतात आले होते. या दोघांमध्ये सविस्तर चर्चा पार पडली. डील यशस्वी झाली. रतन टाटांनी फोर्डकडून जॅग्वार, लँड रोव्हर या 2 कंपन्या २.३ अब्ज डॉलर्सला विकत घेतल्या. यावेळी मात्र फोर्ड कंपनीने रतन टाटांचे कौतुक केले. “तुम्ही आमची कंपनी विकत घेऊन आमच्यावर फार उपकार केले.” अशी प्रतिक्रिया त्यावेळी फोर्ड यांनी व्यक्त केली. जॅग्वार, लँड रोव्हर या कंपनीच्या खरेदीमुळे टाटा आणि फोर्ड यांच्यातील व्यवहाराची जगभरात चर्चा झाली होती. सध्या लँड रोव्हरच्या कार जगभरात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत समाविष्ट आहे.