पाटणा: पाटण्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्जही केला. रस्त्यावर ठिय्या आंदोलन केल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यावेळी पोलिसांनी पाटणा एसडीएम श्रीकांत कुंडलिक खांडेकर यांच्यावर लाठीचार्ज केला. मात्र, पोलिसांनी चुकून एसडीएमवर लाठीचार्ज केला होता. अशा परिस्थितीत पाटणाचे एसडीएम श्रीकांत कुंडलिक खांडेकर कोणत्या बॅचचे अधिकारी आहेत? आणि त्यांनी कुठे शिक्षण घेतले आहे? हे जाणून घेऊया.
श्रीकांत खांडेकर हे 2020 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. बिहारमधील नालंदा येथे सहाय्यक जिल्हाधिकारी (प्रशिक्षण अंतर्गत) या पदावर नियुक्ती झाली. 2020 मध्ये त्यांची नियुक्ती मसुरीमध्ये पहिला टप्पा प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर करण्यात आली. सध्या ते पाटणा येथे एसडीएम पदावर कार्यरत आहेत.
श्रीकांत खांडेकर पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण
श्रीकांत खांडेकर यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि 33 वी रँक मिळवली. ते महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील बाबची गावचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील अशिक्षित आहेत, पण श्रीकांत यांच्या शिक्षणासाठी त्यांनी तीन एकर जमीन विकली होती. त्यांना अभ्यास करता येत नसला, तरी मुलांनी अभ्यासात पुढे असावे, असे त्यांचे स्वप्न होते.
जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण
श्रीकांत यांचे सुरुवातीचे शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. निंबोणी इंग्लिश स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी सोलापूर येथून बारावीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दापोली कृषी विद्यापीठात कृषी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. यादरम्यान त्यांची आयआयटीसाठी निवडही झाली, पण आयआयटीमध्ये जाण्याऐवजी त्यांनी यूपीएससी सीएसई परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला.
18 महिन्यांच्या तयारीनंतर यूपीएससी क्रॅक
श्रीकांत यांनी पुण्यात वर्षभर शिक्षण घेतले, त्यानंतर सहा महिने दिल्लीत राहून यूपीएससी नागरी सेवा परीक्षेची तयारी केली. पहिल्याच प्रयत्नात ते ३३व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. ओबीसी प्रवर्गात त्यांनी राज्यात दुसरा क्रमांक पटकावला होता.
‘या’ पुस्तकाने आयएएस केले
श्रीकांत खांडेकर हे शेतकरी पार्श्वभूमी असलेले आहेत. जेव्हा ते 12वीत होते, तेव्हा त्यांनी राज मित्र नावाचे पुस्तक वाचले, ज्यामध्ये नागरी सेवांच्या अनेक कथा होत्या आणि त्यापैकी बरेचसे आर्थिकदृष्ट्या मागासलेले होते. त्यांनी बारावीतच ठरवले होते की, त्यांना आयएएस व्हायचे आहे.