चंडीगढ़: नायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री असतील. नायब सैनी यांचा जन्म २५ जानेवारी १९७० रोजी अंबाला येथील मिर्झापूर माजरा गावात सैनी कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण बीए आणि एलएलबी झाले आहे. सैनी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. सैनी हे ओबीसी समाजातील आहेत. त्यांना अनेक संस्थेत काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे.
2002 मध्ये ते युवा मोर्चा भाजप अंबालाचे जिल्हा सरचिटणीस झाले. यानंतर 2005 मध्ये ते युवा मोर्चा भाजप अंबालाचे जिल्हाध्यक्ष होते. सैनी 2009 मध्ये किसान मोर्चा भाजप हरियाणाचे प्रदेश सरचिटणीसही होते. 2012 मध्ये ते अंबाला भाजपचे जिल्हाध्यक्ष झाले. आरएसएसमध्ये असल्यापासून सैनी हे मनोहर लाल खट्टर यांच्या जवळचे मानले जातात. मुख्यमंत्र्यांनीच त्यांना कुरुक्षेत्रातून तिकीट देण्याची विनंती केली होती.
नायब सिंह यांनी 2009 मध्ये अंबाला येथील नारायणगड मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, परंतु रामकिशन गुर्जर यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. 2014 मध्ये त्यांनी याच भागातून 24,361 मतांनी निवडणूक जिंकली. त्यानंतर त्यांनी 24 जुलै 2015 ते 3 जून 2019 पर्यंत राज्य सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणूनही काम केले. राज्यातील कामगार आणि रोजगार मंत्रिपदाच्या स्वतंत्र प्रभाराशिवाय त्यांनी खाण, भूविज्ञान मंत्री आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री म्हणूनही कार्यभार सांभाळला. सध्या ते कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांच्या आधी भाजपचे राजकुमार सैनी खासदार होते.