कोलकाता: पश्चिम बंगालमधील पूर्व मिदनापूर येथे एनआयए पथकावर झालेल्या हल्ल्यावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या टीएमसी नेते मोनोब्रता जाना यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून एनआयए टीम आणि सीआरपीएफ अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. खरं तर, टीएमसी नेत्याच्या पत्नीने आरोप केला आहे की, एनआयए अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली. अधिकाऱ्यांनी आपल्या सन्मानाचा अपमान केल्याचा आरोपही त्यांनी केला. याप्रकरणी भूपतीनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२५, ३४, ३५४, ३५४ (बी), ४२७, ४४८, ५०९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय होतं प्रकरण?
एनआयए टीम २०२२ साली झालेल्या बॉम्बस्फोटाच्या तपासासाठी गेली होती. यावेळी एनआयएचे पथक दोन आरोपींना अटक करून कोलकाता येथे आणत होते, त्यादरम्यान एनआयए पथकावर हल्ला करण्यात आला. ग्रामस्थांनी एनआयए पथकाच्या ताफ्याला घेराव घातला आणि दगडफेक केली. या हल्ल्यात अनेक अधिकारी जखमी झाले आहेत. एनआयए टीमवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भाजप टीएमसी सरकारवर हल्लाबोल करत आहे. ममता बॅनर्जींच्या राजवटीत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असून हे सर्व पोलिसांच्या संगनमताने होत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
या घटनेवर ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया :
ममता बॅनर्जी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि विचारले की, “एनआयएने मध्यरात्री छापेमारी का केली? त्यांनी पोलिसांची परवानगी घेतली होती का? जेव्हा एखादा अनोळखी व्यक्ती त्यांच्या जागेवर आला तेव्हा स्थानिक लोकांनी असेच केले. ते करायला हवे होते.” केंद्र सरकारवर निशाणा साधत ममता म्हणाल्या, “ते (NIA) निवडणुकीच्या आधी लोकांना अटक का करत आहेत?
या घटनेवर भाजप नेते राहुल सिन्हा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर आरोप करत त्या हल्लेखोरांच्या समर्थनार्थ उभ्या असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की जिथे मुख्यमंत्री हल्लेखोरांना पाठीशी घालतात तिथे हल्ले होणे स्वाभाविक आहे.