बांगलादेश : बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला असून यामध्ये ७९ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर १०० हुन अधिक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेनंतर बांगलादेशमध्ये अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लावण्यात आला आहे. तसेच इंटरनेटदेखील बंद करण्यात आले आहे. भारत सरकारने देखील या घटनेनंतर बांगलादेशमधील भारतीय नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहण्याच्या सुचना दिल्या असून हेल्पलाईन +88-01313076402 नंबर देखील जारी करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, आज (रविवारी) पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी काही नागरिकांनी अहसहकार आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानुसार हे नागरिक या आंदोलनात सहभागी होण्यासाठी ढाक्यातील सायन्स लॅब चौकात जमा झाले होते. मात्र, यावेळी त्यांना अवामी लीग, छात्र लीग आणि जुबो लीगच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये जोरदार राडा सुरू झाला.
तसेच काही आंदोलनकांनी ढाक्याच्या शाहबाग परिसरातील बंगबंधू शेख मुजीब वैद्यकीय महाविद्यालयासह या भागातील काही कार्यालय आणि आस्थापनांवरही हल्ले करण्यास सुरुवात केली. दरम्यान, काही आंदोलकांनी लाठ्या-काठ्या घेऊन शाहबाग चौकात गर्दी केली, त्यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.
दरम्यान, बांगलादेशमध्ये आंदोलनाच्या नावाखाली हिंसाचार करणारे विद्यार्थी नाहीत, तर दहशतवादी आहेत, असा दावा पंतप्रधान शेख हसीना यांनी केला. विद्यार्थ्यांनी आणि जनतेने अशा समाजकंटकांना दूर ठेवावे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी सरकारला साह्य करावे, असे आवाहनही हसीना यांनी यावेळी केले आहे.