विनेश फोगाटला रौप्य पदक नाहीच… ! क्रिडा लवादाने याचिका फेटाळली; आशा संपुष्टात
नवी दिल्ली : भारताची पैलवान विनेश फोगाट हिला मोठा धक्का बसला आहे. विनेश फोगाटनं कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्समध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये निलंबित करण्यात आलं होतं. या निर्णयाविरोधात विनेश फोगाटनं क्रीडा लवादाकडं धाव घेतली होती. दरम्यान, क्रिडा लवादाने ऑलिम्पिक अपात्रतेच्या निर्णयानंतर आता कुस्तीपटू विनेश फोगटच्या रौप्य पदकाची याचिका फेटाळली आहे. यामुळं विनेश फोगाटला रौप्य पदक मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
विनेश फोगाट हिला पॅरिस ऑलिम्पिकच्या 50 किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्ती प्रकाराच्या अंतिम फेरीतील सामन्यापूर्वी निलंबित केलं होतं. अंतिम फेरीपूर्वी घेण्यात आलेल्या चाचणीत विनेश फोगाटचं वजन 100 ग्रॅमनं जास्त नोंदवलं होतं. त्यामुळे तिला निलंबित करण्यात आलं होतं. विनेश फोगाटनं या प्रकरणी कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टसमध्ये धाव घेत याचिका दाखल केली होती.
मात्र, येथे देखील विनेश फोगाटच्या पदरी निराशा आलेली आहे. विनेशच्या याचिकेवर 9 ऑगस्टला सुनावणी पार पडली होती. दरम्यान, विनेश फोगाटनं राष्ट्रकूल स्पर्धेत तीन सुवर्णपदकं जिंकली आहेत. तर आशियाई स्पर्धेत एकदा सुवर्ण आणि कांस्य पदकावर नाव कोरलं आहे.
आत्तापर्यंत काय काय घडलं?
भारताची पैलवान विनेश फोगाट हिने तिच्यावरील अपात्रतेच्या निर्णयावर क्रीडा लवादाकडे दाद मागितली होती. त्यानंतर क्रीडा लवादाने विनेश फोगाटची अपील स्वीकारली आणि तिचं म्हणणं ऐकून घेत हा निर्णय दिला आहे. तसंच जागतिक कुस्ती महासंघ आणि ऑलिम्पिक समितीच्या या निर्णयाला भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून आव्हान देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली होती.
पैलवान विनेश फोगाटने याआधी क्रिडा लवादाकडे फायनल थांबवावी, अशी अपिल करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणाला लवादाने स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर विनेशला रौप्य पदक देण्यात यावं, अशी विनंती लवादाकडे करण्यात आली. या विषयावर मत मांडण्यासाठी विनेशला अनुमती देखील देण्यात आली होती. त्यामुळे विनेशला मोठा दिलासा मिळाला होता.
त्यानंतर दुसऱ्या याचिकेमध्ये रौप्य पदकाची मागणी करण्यात आली होती. ज्यावर CAS कडून या प्रकरणी विचारपूर्वक निर्णय देण्याचे संकेत देण्यात आले. त्यानंतर तात्काळ विनेशची बाजू मांडण्यासाठी हरीश साळवे यांची निवड करण्यात आली. हरीश साळवे यांनी आतापर्यंत अनेक कायदेशीर संघर्षांचा निकाल आपल्या बाजूनं वळवण्याची किमया केल्याने सर्वांच्या नजरा या निर्णयाकडे लागल्या होत्या. मात्र, आता विनेशला मेडल घेऊन भारतात येता येणार नाही.