वडोदरा: सध्या देशभरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना झाल्याच्या बातम्या देखील समोर येत आहेत. काही ठिकाणी इमारती कोसळल्या आहेत. अशातच गुजरातमधील वडोदरा येथील श्री नारायण शाळेत दुसऱ्या मजल्यावरील खोलीची भिंत कोसळून चार मुले जखमी झाले आहेत. एका विद्यार्थ्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. तिघांना किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. यामध्ये 4 मुले बेंचसह 10 फूट खाली पडताना दिसत आहेत.
ही घटना शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांना पाचारण करण्यात आले. भिंतीच्या मागे शेड असल्याने मुले आधी शेडवर पडली. त्यानंतर जमिनीवर कोसळली. त्यामुळे मुलांना गंभीर दुखापत झाली नाही. सध्या भिंत कोसळण्याचे कारण शोधले जात आहे. दुसरीकडे, वडोदरा पालक संघटनेने शनिवारी शाळा चालकाविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी गुन्हाही दाखल होऊ शकतो.
पोलिसांनी मुलांचे जबाब नोंदवले
पोलिसांनी जखमी मुले, त्यांचे कुटुंबीय आणि शाळा व्यवस्थापनाचे जबाब नोंदवले आहेत. या घटनेनंतर शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून अद्याप कोणतेही निवेदन देण्यात आलेले नाही. जुनी इमारत असल्याने हा अपघात झाल्याचे स्थानिकांनी सांगितले होते. मात्र, त्यांच्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असल्याचे शाळा प्रशासनाचे म्हणणे आहे.
या शाळेत 1200 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात . भिंत कोसळल्याने शुक्रवारी शाळा बंद करण्यात आली. शाळेला एक महिन्यापूर्वी संरचना स्थिरता प्रमाणपत्र देण्यात आले. भिंत कोसळण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
Gujarat Model is collapsing‼️#SHOCKING Half a dozen children were injured when a wall of a School Collapsed in Vadodara (#Gujarat). This accident happened during the lunch break.
To run every school, building safety certificate has to be obtained every year. Was the safety… pic.twitter.com/nxTe2gpWEU
— Dipankar Kumar Das (@titu_dipankar) July 20, 2024
या घटनेबाबत शाळेच्या मुख्याध्यापिकांनी म्हणाल्या की , असे घडेल याची आम्हाला कल्पना नव्हती. आम्ही जेव्हा भिंत कोसळलेल्या ठिकाणी पोहोचलो, तेव्हा आम्हाला 4 मुले जखमी झाल्याचे समजले. एका मुलाच्या डोक्याला टाके पडले आहेत. मुलांच्या सायकली ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या. अशी घटना घडेल, याची आम्हाला कल्पना नव्हती.
सोमवारीही शाळा बंद राहणार
शाळेच्या मुख्याध्यापिका रुपलबेन शाह यांनी सांगितले की, सोमवारीही शाळा बंद राहणार आहे. आम्ही आता पर्यायी ऑनलाइन शिक्षणाचा विचार केला आहे. आज आमच्या विश्वस्त मंडळाची बैठक होणार असून, त्यात मुलांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, असा निर्णय घेणार आहोत.