वाराणसी: काशी ज्ञानवापीशी संबंधित वेगवेगळ्या खटल्याची सुनावणी वाराणसी जिल्हा न्यायालयात सातत्याने सुरू आहे. यामध्ये आज म्हणजेच बुधवारी वाराणसी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापी संकुलाशी संलग्न सोमनाथ व्यासजींच्या तळघरात नियमित पूजा करण्याबाबत मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने हिंदूंना व्यासजींच्या तळघरात पूजा करण्याचा अधिकार दिला आहे. तेथे ७ दिवसांत पूजा करण्याची व्यवस्था करावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. तळघरात पूजा करण्याचा अधिकार मिळण्याबाबत मुस्लिम पक्षाने निवेदन जारी केले की, एएसआयच्या अहवालात कुठेही उल्लेख नाही, आम्ही या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत.
गेल्या मंगळवारी, हिंदू-मुस्लिम बाजूने या प्रकरणाबाबत आपापले युक्तिवाद मांडले होते, जिथे हिंदू पक्षकारांनी तळघरात प्रवेश करून पूजा करण्याचे आदेश मागितले होते. यावर मुस्लिम पक्षकारांनी आक्षेप घेतला होता. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या सर्वेक्षणादरम्यान सुमारे तीन महिने तळघर स्वच्छ करण्यात आले होते. आज कोर्टाने दिलेल्या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या.
राखी सिंग यांच्या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने बुधवारी ज्ञानवापी मशिदीच्या अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीला नोटीस बजावली. फिर्यादी राखी सिंह यांनी वाराणसी कोर्टाने २१ ऑक्टोबर २०२३ रोजी दिलेल्या निर्णयाला आव्हान दिले होते, ज्यात त्यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) ला ज्ञानवापी मशीद संकुलातील कथित शिवलिंग वगळता वुजुखानाचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यास नकार दिला होता. न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांच्या कोर्टाने अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटीला ही नोटीस बजावली आहे.