नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (UPSC) निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये आदित्य श्रीवास्तव हा देशात पहिला तर अनिमेश प्रधान देशात दुसरा आला आहे. मागील दोन परीक्षांमध्ये यूपीएससीचे (UPSC) पहिले तीन क्रमांक मुलींनीच पटकावले होते. यावर्षी मात्र मुलींना मागे टाकून मुलांनी बाजी मारली आहे.
देशात तिसऱ्या क्रमांकावर डोनुरू अनन्या रेड्डी आहे. २०२३ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षांचे हे निकाल असून upsconline.nic.in आणि upsc.gov.in या संकेतस्थळांवर सविस्तर निकाल तुम्हाला पाहाता येईल.
यावर्षीच्या यूपीएससीच्या (UPSC) परीक्षांमध्ये १०१६ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ३४७ उमेदवार खुल्या प्रवर्गाचे, ११६ उमेदवार आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे, ३०३ उमेदवार ओबीसी प्रवर्गाचे, १६५ उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्गाचे तर ८६ उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आहेत. गेल्या वर्षी हेच प्रमाण खुला प्रवर्ग – ३४५, आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग – २८, ओबीसी – ५२, अनुसूचित जाती – ५ तर अनुसूचित जमाती – ४ असे होते.
आयएएस (IAS) अर्थात भारतीय प्रशासकीय सेवा, आयपीएस (IPS)अर्थात भारतीय पोलीस सेवा, आयएफएस (IFS) अर्थात भारतीय परराष्ट्र सेवा व गट अ आणि गट ब मधील इतर केंद्रीय सेवांसाठी ही पदभरती करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
असा पाहा UPSC चा निकाल…
– upsc.gov.in या संकेतस्थळावर UPSC CSE Results या लिंकवर क्लिक करा.
– आपले लॉगइन डिटेल्स याजागी भरा.
– तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
– निकालपत्र डाऊनलोड करण्याचाही पर्याय इथे देण्यात आला आहे.