नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाबाबत (UPSC) एक मोठी बातमी समोर येत आहे. युपीएसीचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. आधीच महाराष्ट्रात पूजा खेडकर प्रकरणावरून युपीएसीची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे. त्यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाबाबत आता अनेक शंका कुशंकांना वर्तविला जात आहेत. निवडीसाठी युपीएसीच्या उमेदवारांकडून बनावट जात आणि अपंगत्व प्रमाणपत्र वापरण्याबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा आल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
पाच वर्ष मुदतीपूर्वीच दिला राजीनामा..
मिळालेल्या वृत्तानुसार, मनोज सोनी, ज्यांनी मे 2022 मध्ये युपीएसीचे चेअरपर्सन म्हणून पदभार स्वीकारला, त्यांच्या कार्यकाळाचे अजून पाच वर्षे बाकी आहेत. मनोज सोनी यांनी महिनाभरापूर्वीच आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला होता, मात्र त्यावर सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. सोनी यांच्या राजीनाम्याचा सध्या सुरू असलेल्या वादाशी संबंध नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
देशातील सर्वात तरुण कुलगुरू..
युपीएसीच्या अध्यक्षपदी नियुक्ती होण्यापूर्वी, डॉ. सोनी यांनी 28 जून 2017 ते 15 मे 2023 पर्यंत केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून काम केले. डॉ. सोनी यांनी तीन वेळा कुलगुरू म्हणून काम पाहिले. 1 ऑगस्ट 2009 ते 31 जुलै 2015 पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सलग दोन टर्म आणि एप्रिल 2005 पासून महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी ऑफ बडोदाचे (एमएसयू ऑफ बडोदा) कुलगुरू म्हणून एक टर्म एप्रिल 2008 पर्यंत होते. एमएसयू ऑफ बडोदामध्ये रुजू होताना डॉ. सोनी हे भारतातील सर्वात तरुण कुलगुरू होते. वैयक्तिक कारणास्तव सोनी यांनी राजीनामा दिला आहे. डॉ. सोनी यांना गुजरातमधील स्वामीनारायण संप्रदायाची शाखा असलेल्या अनूपम मिशनसाठी अधिक वेळ घालवायचा आहे, असे अहवालात नमूद केले आहे.