बागपत : उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्याच्या कोटाना येथील शत्रू संपत्ती अंतर्गत मोडणाऱ्या दोन हेक्टर जमिनीचा शुक्रवारी १.३८ कोटी रुपयांना लिलाव करण्यात आला. ही जमीन पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांच्याशी संबंधित आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मुशर्रफ यांचे आजोबा कोटाना येथे वास्तव्यास होते. त्यांच्या नावाने जमिनीची नोंद स्थानिक प्रशासनाकडे आहे.
परंतु, मशर्रफ त्यांच्या हयातीत कधीच कोटाना येथे आले नाही. त्यांचे आई-वडीलसुद्धा इथे कधी आले नव्हते. पण मुशर्रफ यांच्या चुलत्याने इथे वास्तव्य केले होते, असे स्थानिक उप-जिल्हाधिकारी अमर वर्मा यांनी सांगितले. दरम्यान, परवेज मुशर्रफ संबंधित जप्त केलेल्या जमिनीला २०१० मध्ये शत्रू संपत्ती घोषित करण्यात आले होते. अशी संपत्ती पाकिस्तानी नागरिकांच्या मालकीशी संबंधित असते. तिचे व्यवस्थापन केंद्रीय गृह मंत्रालयाद्वारे केले जाते.