Unseasonal rain : नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गुजरात राज्यात अवकाळी पावसामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. रविवारी सकाळपासून चालू असलेल्या या पावसामुळे अनेक शहरं आणि जिल्ह्यांमधील जनजीवन विस्कळीत झाल्याच पहायला मिळालं. राज्यात आतापर्यंत वीज पडून २० जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या याहून अधिक असू शकते असं म्हटलं जात आहे. तर ४० हून अधिक पाळीव जनावरं (गायी,म्हशी, शेळ्या) दगावली आहेत.
मोरबीमध्ये गारांसह पाऊस
मोरबीमध्ये गारांसह पाऊस झाला. सौराष्ट्रातील जुनागढ, कच्छ, गीर-सोमनाथ, उना, गोडल, जेतपूरसह अनेक भाग प्रभावित झाले आहेत. अमरेली, सुरेंद्रनगर, मेहसाना, बोताड, पंचमहाल, खेडा, साबरकांठा, सुरत आणि अहमदाबाद या जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसला आहे. या जिल्ह्यांमध्ये पावसासह ताशी ५ किमी वेगाने वारा वाहत असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. गुजरातमधील काही भागात गारपिटीचे दृश्यही पाहायला मिळत आहे. हिवाळ्यातही पावसाळ्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे.
फळबागांसह रबी पिकांच नुकसान
मोरबीमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सिरॅमिक कारखान्याचे छत उडून गेले. राजकोटमधील कुवाडवा रोडच्या मलियासनजवळ रस्त्यावर बर्फ पसरून रस्ता झाकला गेला आहे. अवकाळी पाऊस झाल्यास पिकांवर रोग पडून मोठं नुकसान होत. सध्या बहुसंख्य शेतकऱ्यांनी गहू, ज्वारी, मूग या पिकांची लागवड केली आहे. त्यानंतर पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरीही संभ्रमात पडले आहेत. वादळी वाऱ्यामुळे चिकू, ज्वारी, कापूस या पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे.
महाराष्ट्रात पिकांचं मोठं नुकसान
दुसऱ्या बाजूला, महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय. चंद्रपूर जिल्ह्यात सकाळी सात वाजेपासून सर्वत्र अवकाळी पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे थंडीचा गारवा असताना अवकाळी पावसामुळे वातावरण आणखी थंड झालं आहे. शेतात रब्बी पिके उभी आहेत. अशात पाऊस सुरू झाल्याने शेतीचे मोठे नुकसान होणार आहे.