मध्य प्रदेश : केंद्रीय दळणवळण आणि पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर मधमाशांनी हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे. यात 12 ते 13 जण जखमी झाल्याची माहिती आहे. काल (शनिवार) ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. माधव नॅशनल पार्कमधील चांदपाठा तलावात ड्रेजिंग मशीनचं उद्घाटन करण्यात येणार होतं. या उद्घाटन करण्यासाठी ज्योतिरादित्य सिंधिया हे गेले होते. यावेळी मधमाशांनी ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांच्या सुरक्षाकर्मचाऱ्यांवर एकच हल्ला चढवला.
ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर मधमाशांचा हल्ला
मध्य प्रदेशमधील शिवपुरी भागात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया गेले होते. माधव नॅशनल पार्कमधील चांदपाठा तलावात ड्रेजिंग मशीनचं सिंधिया यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी मधमाशांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर हल्ला केला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना यातून वाचवलं आहे. मात्र त्यांच्यासोबत असलेले काही कार्यकर्ते आणि पोलीस कर्मचारी या हल्ल्यात जखमी झाले आहेत. शिवाय तिथं उपस्थित असणारे सर्वसामान्य लोकही या हल्ल्यात जखमी झाले आहेत. तर ज्योतिरादित्य सिंधिया हे या हल्ल्यातून बचावले आहेत.
ज्योतिरादित्य सिंधिया थोडक्यात वाचले..
सेलिंग क्लबच्या खालच्या बाजूला मधमाशांचा पोळा होतं. ज्योतिरादित्य सिंधिया हे ड्रेजिंग मशीनकडे जात होते. याचवेळी मधमाशांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर हल्ला केला. तेव्हा एकच गोंधळ उडाला. सुरक्षा रक्षकांकडून ज्योतिरादित्य सिंधिया यांना तिथून बाहेर काढलं आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी आणलं. पण याच वेळेत या मधमाशांनी उपस्थितांवर हल्ला केला.
नेमका कसा झाला मधमाशांचा हल्ला?
मीडियाने रिपोर्टनुसार, चांदपाठा तलावात ड्रेजिंग मशीनच्या उद्घाटन कार्यक्रमाचं व्हीडिओ शूटिंग करण्यासाठी ड्रोन आणला गेला होता. तो ड्रोन हवेत उडवण्यात आला. तेव्हा ड्रोनचा आवाज आणि हवेमुळे मधमाशा भडकल्या आणि त्यांनी लोकांवर हल्ला करायला सुरवात केली. मधमाशांच्या या हल्ल्यात 12 ते 13 जण जखमी झाल्याची माहिती आहे. पण केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया या मधमाशांच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत.