उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात एक भीषण अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. नोएडा-ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कसेबसे मृतदेह बाहेर काढले आहेत. पोलीस सध्या तपास करत आहेत. अपघाताची माहिती मिळताच मृतांच्या कुटुंबीयांमध्ये शोकाचे वातवरण पसरले.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडातील नॉलेज पार्क पोलीस स्टेशन परिसरात सेक्टर-१४६ मेट्रो स्टेशनजवळ नोएडा-ग्रेटर नोएडा एक्सप्रेस वेवर एक ट्रक खराब झाला होता. मागून एक वेगवान कार आली आणि या ट्रकमध्ये घुसली. यामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला. ४ जखमींना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातात कार चक्काचूर झाली आहे.
एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू ..
या अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ३ महिला आणि २ पुरुषांचा समावेश आहे. पोलिसांनी सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. अमन सिंग, देवी सिंह, त्यांची पत्नी राजकुमारी, विमलेश आणि कमलेश अशी मृतांची नावे आहेत.
ओव्हरस्पीडिंग आणि वाहतूक पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. खराब पार्क केलेला ट्रक वेळीच हटवला असता तर अपघात टाळता आला असता. दोन्ही वाहने रस्त्यावरून हटवण्यात आली असून वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.