UGC NET परीक्षा : नीटच्या परीक्षेत उडालेल्या या गोंधळानंतर केंद्र सरकारने सावध पावलं टाकली आहेत. मंगळवारी झालेली यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सकारने घेतला आहे. नीटच्या परीक्षेत गोंधळ झाल्याच्या आरोपानंतर शिक्षण मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. तसेच या प्रकरणाचा तपास आता सीबीआकडे देण्यात आला आहे. त्यामुळे जून सत्रात झालेली परीक्षा आता पुन्हा होणार आहे.
शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, एनटीएने 18 जून 2024 रोजी युजीसी नेट परीक्षा दोन टप्प्यांत देशातील विविध शहरांमध्ये OMR मोडमध्ये घेतली गेली होती. 19 जून रोजी युजीसीला गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरच्या नॅशनल सायबर क्राइम थ्रेट ॲनालिसिस युनिटकडून परीक्षेसाठी काही इनपुट्स प्राप्त झाले. त्यानुसार प्रथमदर्शनी असे सूचित केले की परीक्षेमध्ये अखंडतेशी तडजोड झाली असावी.
तसेच निवेदनात म्हटले आहे की परीक्षा प्रक्रियेची उच्च पातळीची पारदर्शकता आणि पावित्र्य सुनिश्चित करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने युजीसी नेट जून 2024 ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्याने परीक्षा घेतली जाईल. ज्याची माहिती स्वतंत्रपणे दिली जाईल. याबरोबरच हे प्रकरण सखोल तपासासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवले जाणारा. यूजीसी नेट परीक्षा ही 300 शहरांमधील 1,200 हून अधिक केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. तसेच 9 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
सर्वोच्च न्यायालयाची एनटीएला नोटीस
नीट परीक्षेतील कथित गैरप्रकारांबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी करण्यात आली. यादरम्यान न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला अनेक प्रश्न विचारले.नीट परीक्षेत 0.001 टक्के निष्काळजीपणा असला तरी ती खपवून घेतली जाणार नाही.
सर्वोच्च न्यायालयाने एनटीए आणि केंद्र सरकारला नोटीस बजावून या प्रकरणी उत्तर देण्याचे सांगितले आहे. या वैद्यकीय चाचणीसाठी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल बोलताना सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेकडे विरोधी नजरेने पाहिले जाऊ नये असे सांगितले.