कन्नड : कन्नड-चाळीसगाव रोडवर बस-दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना आज (दि. ८) एक वाजण्याच्या सुमारास कन्नड चाळीसगाव रोडवरील दूध डेअरीजवळ घडली आहे. आदित्य शेखर राहिंज (वय-१७) व ओम श्रावण तायडे (वय-२३, दोघे रा. पोलीस कॉलनी) अशी अपघातात मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य राहिंज आणि ओम तायडे हे दोघे स्कुटी क्र एमएच २० एफओ ९१९९ वरून अंधानेरकडे निघाले होते. तर समोरून कन्नड आगाराची वडनेर कन्नड बस एमएच २० बीएल ०८८३ ही अंधानेरकडून कन्नड कडे जात होती. यावेळी या दोन्ही वाहनांची एकमेकांना जोरदार धडक झाली. ही धडक भीषण होती की, स्कुटी सरळ बसखाली गेली.
या अपघातात आदीत्य राहींज हा जागीच ठार झाला, तर ओम तायडे हा गंभीर जखमी झाला होता. त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली.
दोन पोलीस पुत्रांचा मृत्यू
दोन पोलीस पुत्रांचा आपघात झाल्याचे कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड, माजी नगराध्यक्ष संतोष कोल्हे, शहर पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, सपोनि कुणाल सूर्यवंशी, ग्रामीण सपोनि रामचंद्र पवार तसेच पोलीस कॉलनीतील महिला मुलांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.