नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये ४ दिवसात २ बॉम्बस्फोटच्या घटना घडल्या आहेत. एका मागून एक असे दोन स्फोट झाल्याने मोठ्या प्रमामात जीवितहानी होत आहे. बलुचिस्तानमध्येच दुसरा बॉम्बस्फोट हल्ला झाला. यात २८ जण ठार झाले आहेत.
गुरूवारी ८ जानेवारी रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहेत. पहिला स्फोट पिशिन शहरात झाला होता. त्यात १५ जण मारले गेले आणि ३० जण जखमी झाले तर दुसरा स्फोट बलुचिस्तानातील किला सैफुल्लाह शहरात झाला. यात १३ जण ठार तर दहा जण जखमी झाले. पहिला स्फोट अपक्ष उमेदवार असफंद यार खान कक्कर यांच्या पिशिन शहरातील कार्यालयाबाहेर स्फोट झाला. तर, दुसरा स्फोट किला सैफुल्लाह शहरात जमियत उलेमा ए इस्लाम (जेयुआय-एफ) पक्षाचे उमेदवार मौलाना अब्दुल वासे यांच्या कार्यालयाबाहेर झाला. सध्या दोघेही सुरक्षित आहेत.
बलुचिस्तानचे मुख्यमंत्री अली मर्दान डोमकी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे, ‘शांततापूर्ण मार्गाने निवडणूक प्रक्रिया सुरू असताना समाजकंटकांकडून कारस्थान रचले जात असल्याचे डोमकी म्हणाले. जखमींना सर्वोतोपरी मदत केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.’ पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने हल्ल्यासंदर्भात बलुचिस्तानच्या मुख्य सचिवाकडे आणि पोलिसांकडे अहवाल मागितला आहे.
पाकिस्तानात द्विसदनीय संसदीय व्यवस्था असून त्यात नॅशनल असेंब्लीसाठी बहुतांश सदस्य जनतेतून निवडून येतात.नवाज शरीफ, इम्रान खान, बिलावल भुट्टो यांचे राजकीय भवितव्य या निवडणूकीतून ठरणार आहे. नॅशनल असेंब्लीत ३३६ जागा असून त्यापैकी २६६ जागांसाठी मतदान होणार आहे. त्याचवेळी ६० जागा महिलांसाठी आणि दहा जागा बिगर मुस्लिम प्रतिनिधींसाठी राखीव असतात. पंजाब प्रांतात सर्वाधिक १४१ जागा, सिंध प्रांतात ७५, खैबर पख्तुनख्वा प्रांतात ५५, बलुचिस्तानात २० आणि इस्लामाबादेत तीन जागा आहेत. पाकिस्तानात १२.८५ कोटी मतदार असून ही संख्या एकुण लोकसंख्येच्या निम्मीच आहे.