नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘ट्रम्पेट’ चिन्हाचे ‘तुतारी’ हे मराठी भाषांतर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हाचे नाव ‘तुतारी वाजवणारा माणूस’ असे कायम ठेवले आहे. याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भात एक पत्रक जारी केले आहे.
आयोगाने २६ मार्च २०२४ रोजी मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचा समावेश केला आहे. या पक्षाला मॅन ब्लोईंग तुऱ्हा हे चिन्ह देण्यात आले होते. या चिन्हाचे मराठी भाषांतर निवडणूक चिन्हांच्या तक्त्यात तुतारी असे केले होते. आमच्या पक्षाचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस असे आहे. त्यामुळे मतदारांचा गोंधळ उडून ते ट्रम्पेट या चिन्हाला मतदान करत आहेत.
यास्तव तुतारी चिन्हाचे मराठी भाषांतर ट्रम्पेट असं केले जावे, अशी विनंती शरद पवार गटाने केली होती. दरम्यान, आयोगाने ही विनंती मान्य केली असून यापुढे मुक्त चिन्हांच्या यादीमधील चिन्हाचे भाषांतर ट्रम्पेट असे करण्यात येणार आहे. या चिन्हाचे मराठी नाव तुतारी नव्हे, तर ट्रम्पेट असे दर्शविण्यात यावे, असे आदेश आयोगाने दिले आहेत. त्यामुळे शरद पवार गटाला मोठं दिलासा मिळाला आहे.
फुल ना फुलाची पाकळी मिळाली : सुप्रिया सुळे
आयोगाच्या निर्णयावर पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाले, या निर्णयासाठी मी निवडणूक आयोगाचे आभार मानते. आमची विनंती होती ते चिन्ह यादीतून काढावं. पण, तसं काही झालं नाही. पण, फुल ना फुलाची पाकळी मिळाली आहे. तुतारी आणि तुतारी वाजवणारा माणूस यातील गोंधळ होत होता, याचा फटका आम्हाला लोकसभेला बसला आहे. याबाबत आम्ही सर्व आकडेवारी त्यांच्यासमोर मांडली होती. निवडणुका या देशात पारदर्शकपणे व्हाव्यात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या चौकटीत व्हावं, या निर्णयाचं मी स्वागत करते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
तुतारी वाजवणारा माणूस यामध्ये माणूस हा शब्द महत्त्वाचा : शरद पवार
शरद पवार म्हणाले, तुतारी वाजवणारा माणूस यामध्ये माणूस हा शब्द महत्त्वाचा आहे. मध्यंतरी तुतारी हे चिन्ह निवडणुकीच्या माध्यमातून पुढं आलं. त्यामुळे अनेक लोकांचा घोटाळा झालाय. त्यामुळे हजारो मत चुकीच्या ठिकाणी गेली आहेत. पण, सुदैवाने निवडणूक आयोगाने जे दुसरं चिन्ह होतं, त्याचं नाव तुतारी होतं ते काढून टाकलं असून त्या ठिकाणी ‘ट्रम्पेट’ हे नाव दिलं आहे. आता तिथं तुतारी हा शब्द राहणार नाही. तुतारी वाजवणारा माणूस हा शब्द राहिला, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.