Donald Trump Vs Kamala Harris : साऱ्या जगाचे लक्ष लागून असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारली आहे. अमेरिकन मीडिया रिपोर्ट्समध्ये हा दावा करण्यात आला आहे. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला सिनेटमध्ये बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीच्या निकालामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना आतापर्यंत २७७ इलेक्टोरल मते मिळाली असून राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी किमान २७० मतांची आवश्यकता होती. ट्रम्प यांनी बहुमताचा आकाडा पार केला आहे. तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरीस यांना २२६ इलेक्टोरल मतं मिळाली आहेत.
ट्रम्प यांचा ऐतिहासिक विजय..
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा ऐतिहासिक विजय मिळवला आहे. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. फॉक्स न्यूजनुसार, पॉप्युलर व्होटमध्ये ट्रम्प यांचा विजय हा ऐतिहासिक ठरला आहे. कारण गेल्या २० वर्षांत रिपब्लिकन पक्षाचा कोणताही उमेदवार असे करू शकला नाही.
अमेरिकेसाठी हा सुवर्णकाळ असेल..: डोनाल्ड ट्रम्प
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी जनतेला संबोधित करताना ‘अमेरिकेसाठी हा सुवर्णकाळ असेल.’, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, ‘आपण आपल्या देशाला व्यवस्थित करण्यासाठी मदत करूया. मी प्रत्येक नागरिक, तुम्ही आणि तुमच्या परिवारासाठी लढेल. हा एक राजकीय विजय आहे, जो आपल्या देशाने याआधी कधीही पाहिला नाही, असे काहीही नाही. ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून दिल्याबद्दल मला अमेरिकन जनतेचे आभार मानायचे आहे.’
डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले की, ‘आपल्या देशातील प्रत्येक नागरिक, तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी मी लढेन. दररोज मी माझ्या प्रत्येक श्वासाने तुमच्यासाठी लढेन. अमेरिका मजबूत, सुरक्षित आणि समृद्ध होईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. हा खऱ्या अर्थाने अमेरिकेचा सुवर्णकाळ असेल.’, असे ट्रम्प यांनी सांगितले.