बेळगाव : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. सौंदत्ती डोंगरावरील श्री रेणुका देवीचे दर्शन घेऊन गावाकडे परतणाऱ्या भाविकांच्या ट्रॅव्हलरने थांबलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली आहे. या भीषण अपघातात 14 भाविकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही दुर्दैवी घटना आज शुक्रवारी (दि. 28) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हावेरी जिल्ह्यातील गुंडेनहळी गावात घडली.
हे सर्व मृत भाविक शिमोगा जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. परशुराम (वय-45), भाग्या (वय-40), नागेश (वय-50), विशालाक्षी (वय-40), अर्पिता (वय-18), सुभद्राबाई (वय-65), पुन्या (वय-50), चालक आदर्श (वय-23), मानस (वय-24), रूपा (वय-40) मंजुळा (वय-50) यांच्यासह अन्य महिला, पुरुष व मुलांचा समावेश असून त्यांची नावे समजू शकली नाहीत.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, भद्रावती तालुक्यातील नागेश यम्मेहट्टी यांच्या मुलाने काही दिवसांपूर्वी नवीन ट्रॅव्हलर खरेदी केला होता. त्यामुळे ते नवीन वाहनाची पूजा करण्यासाठी सोमवारी 24 जून रोजी टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये आपले नातेवाईक याना घेऊन गुलबर्गा जिल्ह्यातील चिंचोळी येथील मायम्मा देवीच्या दर्शनासाठी गेले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील तुळजाभवानी मंदिराला गेले. गेल्या चार दिवसांच्या प्रवासानंतर गुरुवारी रात्री या सर्वांनी बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती रेणुका यल्लमाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते सर्वजण पुन्हा आपल्या गावी येत होते.
दरम्यान, पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकचा चालकाला अंदाज आला नसल्याने ट्रकला जोरदार धडक बसली. या अपघातात 13 जण जागीच ठार झाले, तर एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. अन्य तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे हावेरी पोलिसांनी सांगितले.