नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने पर्यटन क्षेत्राला मोठी चालना देण्यासाठी, देशभरातील २३ राज्यांमधील कमी प्रसिद्ध पर्यटन स्थळांच्या विकासासाठी ३२९५. ७६ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यात महाराष्ट्रातील सिंधुदुर्गात अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशियल आणि पाणबुडी पर्यटन (४६. ९१ कोटी) आणि नाशिक येथे ‘राम-कल पथ’चा विकास १४ कोटी) या दोन प्रकल्पांचा समावेश आहे. या निर्णयाचा उद्देश अधिक वर्दळीच्या ठिकाणांवरील ताण कमी करणे आणि देशभरात पर्यटकांचा समतोल राखण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे.
कमी प्रसिद्ध स्थळांवर लक्ष केंद्रित करून, पर्यटनाचा सर्वांगीण अनुभव देण्याची, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याची आणि नवीन प्रकल्प निवडीसाठी धोरणात्मक दृष्टिकोनातून पर्यटन क्षेत्रातील शाश्वत वाढ सुनिश्चित करण्याची मंत्रालयाला आशा आहे. प्रकल्पातील सरकारी गुंतवणूक उत्प्रेरक म्हणून काम करेल, आर्थिक विकासाला चालना देईल आणि रोजगार निर्मिती करेल.
पर्यटन स्थळांच्या ठिकाणी खासगी क्षेत्राचे कौशल्य आणि भांडवल याचा उपयोग करून, राज्ये सार्वजनिक पायाभूत सुविधा विस्तारू शकतात, स्थानिक सुविधा सुधारू शकतात आणि अधिक पर्यटकांना आकर्षित करू शकतात, परिणामी प्रादेशिक अर्थव्यवस्थेला आणि दीर्घकालीन विकासाला चालना देऊ शकतात. पर्यटन मंत्रालय राज्यांना त्यांच्या पर्यटन प्रकल्पांमध्ये प्रगत तंत्रज्ञान समाविष्ट करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. त्याचा वापर करून राज्ये संपूर्ण प्रक्रिया सुव्यवस्थित करू शकतात, पर्यटकांचा ओघ वाढवू शकतात आणि या क्षेत्राच्या वाढीसाठी शाश्वत, अभिनव उपाय उपलब्ध करू शकतात.