तेहरान: हमासच्या राजकीय शाखेचे प्रमुख इस्माइल हानिया यांचा मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इस्माईल हानियाची इराणमध्ये हत्या करण्यात आली आहे. इराणच्या लष्कराने म्हणजेच इराण रिव्होल्युशनरी गार्ड्सनेही याला दुजोरा दिला आहे. रिपोर्ट्सनुसार, इस्माईल हानियाच्या तेहरानमधील घरावर हल्ला करण्यात आला, ज्यात इस्माईल हानियाचा त्याच्या एका अंगरक्षकासह मृत्यू झाला. हमासनेही इस्माईल हनियाच्या हत्येची कबुली दिली असून यासाठी इस्रायलला जबाबदार धरले आहे.
इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या जनसंपर्क विभागाने म्हटले आहे की, बुधवारी सकाळी हा हल्ला झाला असून, या घटनेचा तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. या निवेदनात इस्माईल हनिया यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला असून पॅलेस्टाईनच्या जनतेला पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे. हमासनेही इस्माईल हनियाच्या मृत्यूला दुजोरा देणारे निवेदन जारी केले असून या हत्येचा आरोप इस्रायलवरही केला आहे. मात्र, याबाबत इस्रायलकडून अद्याप कोणतेही वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. याआधी मंगळवारी इस्माईल हनिया यांनी इराणच्या नव्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती आणि इराणच्या सर्वोच्च नेत्याचीही भेट घेतली होती.