नवी दिल्ली: ईशा फाऊंडेशनचे सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्यावर दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. ईशा फाऊंडेशनचे सद्गुरू त्यांच्या मेंदूच्या शस्त्रक्रियेपूर्वी ‘जीवघेण्या परिस्थितीला’ सामोरे जात होते. गेल्या चार आठवड्यांपासून सद्गुरूंना डोकेदुखीचा तीव्र त्रास होत होता. त्यांच्या मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव आणि सूज असल्याचे डॉक्टरांना आढळले, त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. 17 मार्च रोजी त्यांच्या मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणात सूज आणि रक्तस्त्राव झाल्यानंतर सद्गुरूंना अपोलो दिल्ली येथे दाखल करण्यात आले.
याबाबत माहिती देताना दिल्लीच्या अपोलो हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनीत सुरी म्हणाले की, सद्गुरूंच्या जीवाला गंभीर धोका होता. सीटी स्कॅनमध्ये त्यांच्या मेंदूला रक्तस्त्रावासह गंभीर सूज असल्याचे दिसून आले. सद्गुरुंना गेल्या चार आठवड्यांपासून डोकेदुखीचा त्रास होत होता. ही डोकेदुखी खूप तीव्र होती. ते डोकेदुखीकडे दुर्लक्ष करत होते, कारण त्यांना त्यांच्या दैनंदिन कमान जायचे होते.15 मार्च रोजी वेदना खरोखरच तीव्र झाल्या, तेव्हा त्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि मला लगेच कळले की काहीतरी भयंकर घडत आहे.
डॉ. विनीत सुरी, डॉ. प्रणव कुमार, डॉ. सुधीर त्यागी आणि डॉ. एस. चटर्जी या टीमने हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर काही तासांतच त्यांच्या मेंदूतील रक्तस्त्राव थांबवण्यासाठी तात्काळ मेंदूची शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर सद्गुरू यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले. डॉक्टरांनी पुढे सांगितले की, त्यांनी सद्गुरू यांचे एमआरआय केले. त्यात त्यांच्या मेंदूत मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे उघड झाले.
सध्या, सद्गुरुंच्या तब्येतीत सुधारणा होत असून प्रकृती स्थिर आहे. त्यांचा मेंदू, शरीर आणि महत्वाच्या बाबी सामान्य पातळीवर सुधारल्या आहेत. त्यांची प्रकृती अपेक्षेपेक्षा चांगली झाली आहे. डॉ. सुरी यांच्या मते, आम्ही सुरू केलेल्या वैद्यकीय उपायांव्यतिरिक्त, सद्गुरु स्वतःला बरे करत आहेत. तीव्र डोकेदुखीचा त्रास होत असताना सद्गुरू काही सभा आणि एका परिषदेत सहभागी होण्यासाठी राजधानी दिल्लीमध्ये होते.