मुंबई : सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणासारख्या खगोलीय घटनांच माणसाला नेहमीच आकर्षण आणि कुतूहल राहिलेलं आहे. त्यातून घडणाऱ्या घटनांकडे माणुस मोठ्या उत्सुकतेने बघत असतो. अशातच आता 2024 मधील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण आज (2 ऑक्टोबर) असणार आहे. हे ग्रहण कन्या रास आणि हस्त नक्षत्रात होणार असल्याची माहिती आहे.
जेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होतं. आज होणारं सूर्यग्रहण हे कंकणाकृती प्रकारचं ग्रहण असणार आहे. अशा प्रकारच्या ग्रहणादरम्यान चंद्र पृथ्वीपासून दूर असतो. त्यामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. अशावेळी चंद्राच्या पाठीमागे सूर्याची वर्तुळाकार कडे आपल्याला दिसून येते.
‘या’ वेळेला दिसणार सूर्यग्रहण..
अश्विन कृष्ण पक्षातील आमावस्या तिथीच्या दिवशी होणारं हे सूर्यग्रहण भारतीय प्रमाण वेळेनुसार 2 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजून 12 मिनिटांनी सुरू होईल आणि 3 ऑक्टोबर रोजी पहाटे 3 वाजून 17 मिनिटांनी संपेल. या सूर्यग्रहणाचा मध्यकाळ 12 वाजून 15 मिनिटांनी असेल. हे सूर्यग्रहण भारतातून मात्र दिसणार नाही.
कुठून दिसेल सूर्यग्रहण?
हे सूर्यग्रहण दक्षिण अमेरिकेचा उत्तरेकडील भाग, पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, आर्क्टिक, चिली, पेरू, होनोलुलू, अंटार्क्टिका, अर्जेंटिना, उरुग्वे, ब्युनोस आयर्स, बेका बेट, फ्रेंच पॉलिनेशिया महासागर, उत्तर अमेरिकेचा दक्षिण भाग, फिजी, न्यू चिली, ब्राझील, मेक्सिको आणि पेरूमध्ये काही ठिकाणी दिसेल.