नवी दिल्ली : येत्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने २१ जुलै रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सर्वच राजकीय पक्षनेत्यांच्या या पारंपरिक बैठकीला विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी पहिल्यांदाच हजर राहण्याची शक्यता आहे. परंतु, या बैठकीला आम्ही गैरहजर राहणार असल्याचे तृणमूल काँग्रेसने स्पष्ट केले. तर, या अधिवेशनात विरोधी पक्ष नीट-यूजी, मणिपूर हिंसाचार, भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी यांसह अनेक मुद्यांवर आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस अगोदर म्हणजेच २१ जुलै रोजी रविवारी सकाळी ११ वाजता संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बाबत संसदीय कामकाज मंत्रालयाने माहिती दिली आहे. परंतु, या बैठकीला आमचा नेता अथवा प्रतिनिधी हजर राहू शकणार नाही, असे तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार डेरेक ओब्रायन यांनी स्पष्ट केले. याबाबत त्यांनी किरेन रिजीजू यांना लिखित कळवले आहे.
२१ जुलै रोजी १३ काँग्रेससमर्थक कार्यकर्त्यांच्या स्मृतिपीत्यर्थ आम्ही शहीद दिवस पाळतो. १९९३ मध्ये कोलकातास्थित राज्य सचिवालय रायटर्स बिल्डिंगपर्यंत आम्ही मार्च काढणार आहोत, असे ओब्रायन म्हणाले. डाव्या पक्षांच्या सत्ताकाळात कोलकाता पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १३ जण मरण पावले होते. ममता बॅनर्जी तेव्हा युवक काँग्रेसच्या पश्चिम बंगालच्या प्रदेशाध्यक्ष होत्या. १ जानेवारी १९९८ रोजी तृणमूल काँग्रेसची स्थापना केल्यापासून त्या दरवर्षी २१ जुलैला शहीद दिवस साजरा करीत असतात. या दिवशी त्या कोलकात्यात एका रॅलीला संबोधित करतात. त्यामुळे आम्ही सर्वपक्षीय बैठकीत सहभागी होणार नसल्याचे ओब्रायन यांनी सांगितले.